परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना धडा शिकवणार, मनोज तिवारींनी राज ठाकरेंना ललकारलं

शिवसेनेचे लोक आमच्यासोबत आहेत, पण शिवसेनेतून वेगळं होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, ते प्रांताच्या नावाखाली त्रास देतात, असं मनोज तिवारी म्हणाले.

परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना धडा शिकवणार, मनोज तिवारींनी राज ठाकरेंना ललकारलं

कल्याण : परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, अशा शब्दात भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ललकारलं (Manoj Tiwari attacks MNS) आहे. कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत तिवारींनी उत्तर भारतीय मतदारांना भोजपुरीतूनच संबोधित केलं.

‘मुंबई, ठाणे, वाशी, ऐरोलीमध्ये काही जणांना धरुन-धरुन मारहाण केली जाते. कारण ते उत्तर भारतीय आहेत. मी तर हिरो आहे. चित्रपट करायचो, गाणी गायचो. मात्र अचानक माझ्यामध्ये नेता संचारला. मी ठरवलं विरोध करायचा. रस्त्यावर उतरलो, विरोध केला आणि त्यानंतर माझा विजय झाला’ असं मनोज तिवारी म्हणाले.

‘शिवसेनेचे लोक आमच्यासोबत आहेत, पण शिवसेनेतून वेगळं होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, मला त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ते कोण आहेत ते. प्रांताच्या नावाखाली जर ते आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’ अशा शब्दात मनोज तिवारींनी राज ठाकरेंना (Manoj Tiwari attacks MNS) इशारा दिला.

प्रफुल्ल पटेल यांना कधीही अटक : तिवारी

एकीकडे विकासाची कामं करत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांना लुटण्याचे काम विरोधक करत आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीचा दाखला देत मनोज तिवारी यांनी पीएमसी बँक ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची असल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे पटेल यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे, असा दावाही केला.

पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार वांझोटा ; तर फडणवीसांचा खोटारडा : राज ठाकरे

नागरिकांनी बँकेत पैसे भरण्यापूर्वी ही बँक राष्ट्रवादी नेत्यांची बँक नाही ना याची काळजी घ्यावी आणि सरकारी बँकेत पैसे जमा करावे, असे आवाहन मनोज तिवारी यांनी सभेदरम्यान केलं. देवेंद्र फडणवीस एकीकडे विकासाची कामे करत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत, असा घणाघातही तिवारींनी केला.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर भारतीय नागरिकांसमोर तिवारी यांनी भोजपुरी गीत गाऊन मनोरंजन केले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI