राहुल गांधींचे निकटवर्तीय मिलिंद देवरांकडून मोदींचं कौतुक

'ह्यूस्टनमधील 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्त्वपूर्ण होता. माझे वडील मुरली देवरा हे भारत आणि अमेरिका यांच्या दृढ संबंधांची अग्रणी होते, अशी आठवण मिलिंद देवरा यांनी करुन दिली.

राहुल गांधींचे निकटवर्तीय मिलिंद देवरांकडून मोदींचं कौतुक

मुंबई : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक (Milind Deora on Narendra Modi) केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी भारताची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवून दिल्याबद्दल देवरांनी मोदींची प्रशंसा केली आहे. देवरांच्या ट्वीटची दखल घेत नरेंद्र मोदींनीही त्यांचे आभार व्यक्त केले.

‘ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्त्वपूर्ण होता. माझे वडील मुरली देवरा हे भारत आणि अमेरिका यांच्या दृढ संबंधांची अग्रणी होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आदरातिथ्य आणि त्यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांच्या योगदानाची ठेवलेली जाण, याचा आम्हाला अभिमान वाटतो’ असं देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘तुम्ही अगदी बरोबर आहात, माझे मित्र दिवंगत मुरली देवरा यांची अमेरिकेसोबतच्या दृढ संबंधांची वचनबद्धता तुम्ही योग्य पद्धतीने अधोरेखित केलीत. दोन राष्ट्रांमधील संबंध गहिरे होत असल्याचं पाहून त्यांना खरोखर आनंद झाला असता. अमेरिकन अध्यक्षांची कळकळ आणि आदरातिथ्य अप्रतिम होती.’ असं उत्तर मिलिंद देवरांच्या ट्वीटला मोदींनी दिलं. त्यावरही देवरांनी मोदींचे आभार मानले.

विशेष म्हणजे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रीजिजू यांनीही देवरांचं कौतुक केलं. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन पंतप्रधानांचं कौतुक केल्याबद्दल रीजिजू यांनी देवरांविषयी कौतुकोद्गार काढले.

सुरुवातीपासून काँग्रेसची धुरा वाहणाऱ्या देवरा कुटुंबाचे शिलेदार मिलिंद देवरा (Milind Deora on Narendra Modi) भाजपच्या वाटेवर आहेत का, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद सर्वांना परिचित असल्यामुळे या अफवांना खतपाणी मिळालं.

काही महिन्यांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपवासी झाले आहेत. त्यात मिलिंद देवरांचीही भर पडली तर काँग्रेसची मोठी वाताहत होण्याची भीतीही व्यक्त झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI