EVM विरोधातील फॉरमॅलिटी पूर्ण केली, बाकी पुढे काय करायचं आम्ही बघू : राज ठाकरे

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी ईव्हीएमला विरोध करत पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली.

EVM विरोधातील फॉरमॅलिटी पूर्ण केली, बाकी पुढे काय करायचं आम्ही बघू : राज ठाकरे
सचिन पाटील

|

Jul 08, 2019 | 1:40 PM

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची दिल्लीत भेट घेतली. “देशभरात ईव्हीएमवर संशय आहे, त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. तसंच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका जुन्या पद्धतीने शिक्क्याने-बॅलेट पेपरद्वारे घ्या” अशी मागणी राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांना केली. सुनील अरोरा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, “2014 नंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात जे काय झालं, त्याबाबत शंका आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका आता बॅलेट पेपरवर घ्याव्या, अशी मागणी आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली. ईव्हीएमबाबत देशभरात संशय आहे. मी केलेलं मतदान माझ्या उमेदवाराला पोहोचलंय की नाही याबद्दल शंका असेल, तर मग मशीन हव्यातच कशाला?  ही गोष्ट मी त्यांच्यासमोर ठेवली. महाराष्ट्रातील आगामी निवडणुका शिक्क्याने व्हाव्या अशी मागणी केली. मला वाटत नाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल. पण उद्या असं नको व्हायला की आम्ही त्यांना कळवलंच नाही. एक फॉरमॅलिटी म्हणून भेट घेऊन पत्र दिलं. बाकी पुढे काय करायचं हे आम्ही बघू”

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी राजधानी दिल्लीत दाखल झाले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अनिल शिदोरे आणि अविनाश अभ्यंकर आहेत. राज ठाकरे रविवारीच दिल्लीला रवाना झाले. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेविरोधात 10 सभा घेतल्या. या सभांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, राज यांच्या या सभांना मिळालेल्या प्रतिसादाचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशयही व्यक्त केला गेला. त्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ईव्हीएमविरोधात भूमिका मांडली.

राजू शेट्टी-राज ठाकरे भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी ईव्हीएम आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. राज ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले, तर आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल, असा अंदाज विरोधीपक्ष वर्तवत आहेत.

संबंधित बातम्या 

राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत!  

राज ठाकरे दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण  

महाराष्ट्रात तिसरा पर्याय, राज आणि राजू शेट्टी एकत्र येणार? 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें