‘प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल त्यांच्या कन्या जे बोलल्या त्यामध्ये सत्य…’, नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबिक किंवा पैशांचे कारण नव्हते तर त्यांची हत्या एक मोठे षडयंत्र होते, असं धक्कादायक वक्तव्य पूनम महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूनम महाजन यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबिक किंवा पैशांचे कारण नव्हते तर त्यांची हत्या एक मोठे षडयंत्र होते, असे वक्तव्य त्यांची कन्या पूनम महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पूनम महाजन यांनी जी भूमिका मांडली यामध्ये काही न काही सत्य असेल. त्या घटनेने भाजपची मानसिकता स्पष्ट होतेय, असं चित्र आपणाला पहायला मिळतंय. वास्तविकता काय असेल ते पूनम महाजन मांडतील”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. विशेष म्हणजे प्रमोद महाजन यांच्या मृत्यूवर त्यांचे भाऊ तथा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या भावाच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीचा मी जीव घेईन, षडयंत्र रचणारी व्यक्ती पोलादी पडद्याच्या आत आहे. षडयंत्र ज्या व्यक्तीनं केलं त्याच्यामुळे मी माझे दोन भाऊ गमावले. ती व्यक्ती मला माझ्या हयातीत भेटली, तर एक तर ती व्यक्ती राहील नाहीतर मी राहीन. प्रमोद महाजन यांनी हे सर्व कष्टाने कमावले होते. पण माझ्या धाकट्या भावाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवून हे कृत्य त्याला करायला लावले”, असं प्रकाश महाजन आज म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “आता तेच अजित पवार चक्की पिसिंग करणार, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. मग तो सत्तर हजार घोटाळा नव्हताच मग ते राजकीय षडयंत्र फडणवीस यांचं होतं का? हा प्रश्न निर्माण होतोय. फडणवीस हे महाराष्ट्राला बेवकूब बनवत आहेत. लोकांना मुख्य मुद्द्यापासून डायवर्ट करत आहेत. हे यातून स्पष्ट झालं. फडणीवस भाजपचा चेहरा म्हणून पुढे आहेत, गेल्या दहा वर्षात त्यांनी महाराष्ट्राची माती केलीय. त्यांनी सर्व व्यवस्था संपवली हे त्यातून स्पष्ट झालं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
‘संपलेल्या माणसाला कोण संपवायला निघणार?’
भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले होते की, मला संपवण्यावसाठी दिल्लीवरून फर्मान निघालं आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “संपलेल्या माणसाला कोण संपवायला निघणार?” असा टोला त्यांनी लागवला.
यावेळी नाना पटोले यांनी ऊसाच्या भावावरही प्रतिक्रिया दिली. “चार कारखान्यापैकी अशोक चव्हाण यांनी दोन कारखाने विकले. सरकारकडून दीडशे कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. जनतेच्या घामाचा पैसा त्यांना मिळाला आहे. तरी त्यांचे कारखाने घाट्यात आहेत. त्यांच्या कारखाण्यात 2500 रुपये भाव आणि यांनी विकलेल्या कारखान्यांना 2800 रुपये भाव आणि अमित देशमुख यांच्या कारखान्याला 3300 रुपये भाव आहे. हे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करत आहे हे सिद्ध होते”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
