दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं ठिकाणावर राहणार नाही; नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
भाजपा नेते आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला

मुंबई – भाजपा नेते आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. कलाबेन डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया साधली. मात्र आता यावरून राजकारण सरू झाले आहे. दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे, आता दिल्ली दूर नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. राऊतांनी पहिले आपले खासदार सांभाळावेत, दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जाग्यावर राहाणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीमधून अपक्ष उमेदवार विजयी झाला. तरी देखील आम्हीच जिंकल्याचा शिवसेनेकडून डंका सुरू आहे. या पोटनिवडणुकीत डेलकर यांची निशाणी धनुष्यबान नसून, बॅट घेतलेला फलंदाज होता. तरी देखील तेच जिंकल्याच्या अविर्भावात शिवसेना उड्या मारत आहे. शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवयच आहे. संजय राऊत यांनी लिहिले की, शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर भगवा फटकवण्यात यश आले आहे, आता दिल्ली दूर नाही. मात्र मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जाग्यावर राहाणार नाही. राऊत यांना लिहिताना भान राहात नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भाजपाशी गद्दारी
पुढे बोलताना राणे म्हणाले की, भाजपाचे 303 पेक्षाही अधिक खासदार आहेत, त्यातला एखादा कमी झाला तर पक्षाला फारसा फरक पडणार नाही. मात्र शिवसेनेचे कवेळ 56 आमदार आहेत, ते देखील मोदींच्या कृपेमुळे निवडून आले. भाजपसोबत युती केली नसती तर 8 आमदार देखील निवडून आले नसते. आधी भाजपसोबत युती केली, आणि मोदींमुळे आमदार निवडून आल्यानंतर त्याच भाजपशी शिवसेनेने गद्दारी करत धोक्याने मुख्यमंत्री मिळवले. हे सर्व जनतेला माहित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी अर्धवट डोक्याचे आहेत, त्यांच्या लोकप्रतिनिधीनी कीती सिंचन प्रकल्प अर्धवट सोडले ते पाहावेत अशी टीका देखील यावेळी राणे यांनी केली.
…तर इंधनाचे दर वाढणारच
दरम्यान दोन दिवसांपूर्वी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला, उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल 5 रुपयांनी तर, डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र या मुद्द्यावरून विरोधक केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आहेत. आधी इंधनाचे भाव भरमसाठ वाढवायचे आणि नंतर ते काही प्रमाणात कमी कारायचे असे भाजपाचे धोरण अल्याची टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच काही दिवसातच हे भाव पूर्वपदावर पोहोचतील असेही काँग्रेसने म्हटले आहे. या आरोपांवर देखील राणे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पेट्रोल, डिझेलचे दर हे अंतरराष्ट्रीय भावावर अवलंबून असातात, त्यामुळे अंतरराष्ट्रीय भाव वाढल्यास पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढणारच असे राणे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन
दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी
