आधी पवारांसोबत चर्चा, मग मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं!

पवार-मोदी भेट केवळ कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती, की कोणती राजकीय कारणंही आहेत, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आधी पवारांसोबत चर्चा, मग मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. या भेटीनंतर नरेंद्र मोदींनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ‘टीव्ही9 मराठी’च्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार-मोदी भेट केवळ कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती, की त्यामागे कोणती राजकीय कारणंही आहेत, याच्या चर्चा रंगू (Narendra Modi meets Amit Shah) लागल्या आहेत.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी पवारांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची माहिती देत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिलं. त्यात नाशिक आणि नागपूरमधील नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे केंद्राने तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली आहे.

31 जानेवारी 2020 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी मोदींना निमंत्रण दिलं आहे.

राज्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. या दौऱ्याविषयी पवारांनी मोदींना माहिती दिली. मात्र शेतकऱ्यांच्या मुद्दयावर चर्चेच्या बहाण्याने भेट होत असली, तरी पवार-मोदी यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यताही आधीच वर्तवली जात होती. त्यातच या बैठकीनंतर मोदींनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे पवार-मोदींमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींनी पवारांची पाऊण तास भेट घेल्यानंतर अमित शाहांसोबत 15 मिनिटं चर्चा केल्याची माहिती आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक, पवारांना थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर, केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद देण्याचीही तयारी-सूत्र

दरम्यान, भाजपसोबत सत्तेत गेल्यास, केंद्रात तीन मंत्रिपदे, राज्यातील सत्तेत मोठा वाटा आणि जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद असा फॉर्म्युला भाजपने राष्ट्रवादीला ऑफर केल्याची माहिती, महाराष्ट्र टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे. त्यामुळे या वृत्तात तथ्य असल्यास पवार-मोदी भेटीत याबाबत चर्चा झाल्याची चिन्हं आहेत.

पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं

आदरणीय पंतप्रधान,

यावर्षी अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील 325 तालुक्यांमधील जवळपास 54.22 हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. या अभुतपूर्व परिस्थितीची आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मी 1 नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यात आणि 14 नोव्हेंबरला नागपूर विभागात भेटी दिल्या.

माझ्या या भेटींमध्ये मी जे अनुभवलं ते अत्यंत वेदनादायक आणि धोक्याची घंटा वाजवणारं आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने महाराष्ट्रातील मोठ्या भागात शेतातील जवळपास प्रत्येक पीक उद्ध्वस्त केलं. मी भेट दिलेल्या नाशिक आणि नागपूरमधील इशारा देणाऱ्या परिस्थितीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो.

नाशिक जिल्हा

1. नाशिकमध्ये सोयाबीन, धान, बाजरी, मका, टोमॅटो, कांदा आणि इतरही फळभाज्यांचं पीक अगदी काढणीच्या स्थितीत होतं. अवकाळी पावसाने ही सर्व पिकं अक्षरशः मातीमोल झाली आहेत.

2. नाशिक भागात द्राक्ष हे महत्त्वाचं पीक आहे. त्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बागलान तालुक्यात द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. यामुळे बाजारात लवकर द्राक्षं येतात आणि त्याचा चांगला परिणाम निर्यातीवरही होतो.

3. नाशिकमध्ये एकूण 8 आदिवासी तालुक्यांचा समावेश आहे. तेथे धान हेच प्रमुख पीक असून उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात एका आदिवासी महिलेने अवकाळी पावसाने धानाचं पीक उद्ध्वस्त केल्यानं तयार झालेल्या संकटाबद्दल काळजी व्यक्त केली.

4. मागील 10 महिन्यात नाशिकमध्ये या कोलमडून टाकणाऱ्या परिस्थितीमुळे एकूण 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

5. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक स्तरावर जी माहिती दिली त्यावरुन नाशिकमध्ये 3.50 लाख हेक्टर शेतीचे नुकसान केले आहे. या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरुच आहेत. पंचनाम्यांचा वेग वाढवायला हवा.

6. येवला आणि इतर तालुक्यांमध्ये मोठा काळ पाऊस पडत राहिल्याने तयार झालेल्या आद्रतापूर्ण वातावरणात शेळी आणि मेंढ्यांमध्ये आजारांचं प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर जिल्हा (विदर्भ)

1. नागपूर हे संत्र्याची राजधानी आहे. मात्र, यावर्षी मान्सूनसह परतीच्या पावसाने संत्र्याच्या पिकावर दुष्परिणा झाला. त्यामुळे संत्र्याच्या उत्पादनात 50-60 टक्के घट होणार आहे.

2. अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातील 35 हजार हेक्टर कपाशीच्या पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. या पावसाने कापसाच्या बोंडांच्या नैसर्गिक प्रक्रियेला बाधा पोहचली आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

3. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे कपाशी, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी या पिकांचं 45 हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे 88 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Narendra Modi meets Amit Shah

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI