राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड, जयंत पाटलांकडून घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड, जयंत पाटलांकडून घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांनी प्रथम अजित पवार यांचं नाव राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी सुचवलं. याला जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. तसेच पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळीत गोड खातं आलं नसल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, “आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत. जनतेने आपल्याला मजबूत विरोधीपक्षासाठी कौल दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण विरोधी पक्षात राहून अनेक प्रश्न ताकदीने मांडू.”


मला अजूनही विश्वास बसत नाही की मी 1 लाख 65 हजार मताधिक्याने निवडून आलो. बारामतीच्या लोकांनी हे प्रेम दाखवलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

जयंत पाटील यांनी या बैठकीत महाआघाडीच्या निवडणुकीतील कामकाजावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “विदर्भातील जनतेने आपले 6 आमदार निवडून दिले आहेत. यातून त्यांनी विदर्भात लक्ष द्यायची गरज असल्याचाच संदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात महाआघाडीला शुन्यावर आणणार असंही बोललं गेलं. मात्र, अहमदनगरच्या जनेतेने आपले 12 पैकी 6 आमदार निवडून दिले आहेत.”

लोकसभा निवडणुकीनंतर सहा आमदार निघून गेले. त्यानंतर 10 ते 12 आमदार सोडून गेले. मात्र, शरद पवार यांनी आपल्या कर्तबगारीवर राज्यात काहीही होऊ शकतं हे दाखवून दिलं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विधीमंडळ विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्याच नेत्याची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI