पक्ष मोठा झाल्याने समन्वय नाही, काँग्रेससारखी परिस्थिती होईल : प्रकाश मेहता

भाजप पक्ष आता मोठा झालाय, त्यामुळे समन्वय राहिलेला नाही. अगोदर तिकीट कापताना किमान विश्वासात घेतलं जायचं, अशी हताश प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash Mehta ticket) यांनी दिली.

पक्ष मोठा झाल्याने समन्वय नाही, काँग्रेससारखी परिस्थिती होईल : प्रकाश मेहता

मुंबई : भाजपच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं तिकीट (Prakash Mehta ticket) कापण्यात आलंय. पण तिकीट कापलं यापेक्षा ते कापताना विश्वासातही घेतलं नाही याची खंत या नेत्यांच्या मनात आहे. भाजप पक्ष आता मोठा झालाय, त्यामुळे समन्वय राहिलेला नाही. अगोदर तिकीट कापताना किमान विश्वासात घेतलं जायचं, अशी हताश प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash Mehta ticket) यांनी दिली. घाटकोपरमधून प्रकाश मेहता यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी पराग शाह यांना संधी देण्यात आली आहे.

प्रकाश मेहता यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शाह यांची गाडी फोडली. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “पक्षाने तिकीट का नाकारलं याचं कारण शोधायचंय. योग्य त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला आहे. तिकीट द्यायचं नव्हतं तर किमान विश्वासात घेतलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं. पण पक्षाने खुप काही दिलंय. मी समाधानी आहे. सहा वेळा निवडून आलो. दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो. माझ्याकडे आज पाच हजार सक्रिय कार्यकर्त्यांचा परिवार आहे. म्हणून या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे,” असं प्रकाश मेहता म्हणाले.

“योग्य ठिकाणी प्रश्न मांडला असून पक्षाने त्याची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला बोलावलंय, तिथे जाऊन चर्चा करणार आहे. 1966 पासून मी संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करतोय. आजपर्यंत कधीही असा प्रसंग आला नव्हता. पण हे सगळं पहिल्यांदाच घडतंय. निराश आणि हताश न होता विषय पक्षाच्या योग्य त्या नेत्यांसमोर पोहोचवण्याचं काम मला करावं लागणार आहे आणि मी ते करणार आहे. माझ्यावर अन्याय झालेला नसला तरी मनात खंत आहे,” अशी प्रतिक्रिया प्रकाश मेहता यांनी दिली.

“तिकीट ठरवण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय. त्यामुळे समन्वय नीट होत नसेल, पण त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आतापर्यंत पक्षाची प्रथा आणि परंपरा आहे की एखाद्याला थांबवायचं असेल किंवा दुसरी जबाबदारी द्यायची असेल, तर तसं सांगितलं जात होतं. पण सध्या ज्यांना तिकीट नाकारलं जातंय, त्यांना याबाबत काहीच कळत नाही,” अशी हताश प्रतिक्रिया मेहता यांनी दिली.

प्रकाश मेहतांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय भाजपविरोधात संतापही व्यक्त करण्यात आला. यावर प्रकाश मेहता म्हणाले, “भाजपची परिस्थिती काँग्रेससारखी होईल अशी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे. ती भावना पंतप्रधानांसमोर मांडणार असून पराग शाहांचा प्रचारही करणार आहे.”

संबंधित बातम्या :

देशातील सर्वाधिक संपत्तीचा उमेदवार, मेहतांच्या समर्थकांनी गाडी फोडलेल्या पराग शाहांची संपत्ती किती?

प्रकाश मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांचा राडा, पराग शाहांची गाडी फोडली

अमित शाहांना जरुर विचारणार, मला तिकीट का नाही? : विनोद तावडे

खडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI