राऊत स्वतःला न्यायाधीश समजतात; देशमुख प्रकरणावरून लाड यांची टीका

संजय राऊत यांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत हे अनिल देशमुख यांच्यावरून भाजपावर जे आरोप करत आहोत, त्याचा आधी त्यांनी अभ्यास कारावा असे लाड यांनी म्हटले आहे.

राऊत स्वतःला न्यायाधीश समजतात; देशमुख प्रकरणावरून लाड यांची टीका
प्रसाद लाड, भाजप आमदार

मुंबई – अनिल देशमुख स्वत:हून ईडीसमोर हजर झाले आहेत. आता ईडीची जबाबदारी आहे की, जे तक्रारदार आहेत त्यांना ईडीने समोर आणावं. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी असे बरेच लोक पळून गेले आहेत. त्यांना देशात आणले का? हे सर्व लोक पळून जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राच्या मदतीशिवाय ते पळून जाऊच शकत नाहीत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांच्या या वक्तव्याला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे स्वतःला धर्माधिकारी असल्या सारखे वागत आहेत, ते स्वतःला न्यायाधीश समजतात. देशमुखांबाबत ते जे वक्तव्य करत आहेत, त्याचा अभ्यास त्यांनी आधी करावा. पोलिसांच्या बदल्यांमधला भ्रष्टाचार, अनिल देशमुख आणि वाझे यांच्यातील संबंध, शंभर कोटींचे आरोप याबाबत राऊत काहीच बोलत नाहीत. ते फक्त केंद्रावर उटसूट टिका करण्याचे काम करतात असे लाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना लाड म्हणाले की, केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊन जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्य सरकार पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी केंद्राने घटवलेल्या उत्पादन शुल्कावरून टीका करत आहे. परंतु केंद्राने पेट्रोल स्वस्त केले आता ते पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का यावर कोणीच बोलत नसल्याचा टोला देखील लाड यांनी यावेळी लगावला आहे.

काय म्हणाले होते राऊत?

देशमुखांवर आरोप करणारे जे लोकं आहेत ते आरोप करून पळून गेले नाही, त्यांना पळवून लावले आहे. पळून जाणारा व्यक्ती केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. पोलीस खात्याचा आयुक्त असलेला अधिकारी हा देश सोडून जातो, तेव्हा केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्याने आरोप केला आणि पळून गेला. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते. तपास होऊ शकतो. पण मला वाटतं हे सर्व ठरवून चाललं आहे. महाविकास आघाडीतील जे प्रमुख लोकं आहेत त्यांना त्रास देऊन त्यांची बदनामी करायची हाच भाजपाचा प्रमुख अजेंडा असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

…तर ते भाजप सोडून जातील 

आम्ही या पातळीवर उतरणार नाही. आम्हाला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपायची आहे. बोंबलणारे लोक बाहेरचे आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे मूळचे लोकं आहेत. त्यांना आम्ही उत्तर देऊ ना. हे हौशे गवशे, नवशे  बाहेरून आले आणि भाजपचा झेंडा फडकवून आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना काय माहीत आहे भाजप? आम्ही अटलजी, अडवाणी, मुरली मनोहर जोशींसोबत काम केलेले लोकं आहोत. आमचा भाजपशी जुना संबंध आहे. तुम्ही कधी आलात भाजपमध्ये? आयुष्यभर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या पखाली वाहिल्या. इकडून तिकडे करत असतात. तुम्ही भाजपबद्दल सांगू नका. आम्हाला भाजप आणि संघ काय हे सांगू नका. उद्या भाजपचं सरकार नसेल तेव्हा तुम्ही त्या पक्षात नसाल. उद्या केंद्रातील भाजपचं सरकार गेल्यावर यातील एकही जण भाजपमध्ये नसेल, असे म्हणत संजय राऊत यांनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आता प्रसाद लाड यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या 

हायकोर्टाच्या आदेशानुसार शाहरुखचा मुलगा आर्यन खानने NCB कार्यालयात लावली हजेरी!

भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं, त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार

दिवाळीनिमित्त भेटीगाठी, आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शेलार म्हणाले…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI