… तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचं समर्थन : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा दिला आहे

... तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचं समर्थन : राजू शेट्टी


औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा दिला आहे (Raju Shetti on MNS Maha Morcha). मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल, तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, “बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार आज नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. सीएए हा तर सरळसरळ संविधानाच्या विरोधातील कायदा आहे.”

संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे. एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणं अशक्य आहे. माझंच उदाहरण सांगतो. 52 वर्षांपूर्वी माझा जन्म माझ्या घरात झाला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला नाही. त्यामुळे माझा स्वतःचाच जन्माचा दाखला नाही. मी दोनवेळा खासदार, एकदा आमदार आणि एकदा जिल्हा परिषद सदस्य होतो. माझ्यासारख्याची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय आहे, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं.

दरम्यान, मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज (9 फेब्रुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघाला आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. ते आझाद मैदानावरील सभेला (Raj Thackeray MNS Maha Morcha) संबोधित करतील.

गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग आहे. ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आलं असून 2 लाख जणांसाठी आसनव्यवस्था असल्याचाही दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ :


Raju Shetti on MNS Maha Morcha

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI