शिवसेनेचं सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Aditya Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री (CM From Shivsena) असतील अशी अप्रत्यक्ष घोषणा केली.

शिवसेनेचं सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार : संजय राऊत

मुंबई: शिवसेनेचे युवानेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Constituency) यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Aditya Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री (CM From Shivsena) असतील अशी अप्रत्यक्ष घोषणा केली. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो ऐतिहासिक क्षण आला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचं चंद्रयान काही तांत्रिक कारणाने चंद्रावर उतरु शकलं नाही. मात्र, शिवसेनेचं हे सूर्ययान (Suryayaan of Shivsena) 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

यावेळी संजय राऊत यांनी आदित्या ठाकरेंचे राजकारणात प्रवेश केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “महाराष्ट्र तुमचा आभारी आहे. तुम्ही आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली आहे. समोर हाजीअली, बाजूला महालक्ष्मी आहे. तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्राचा छावा राजकारणात आला. शिवाजी महाराजांचा छावा संभाजी राजकारणात आले तेव्हा देशाचे आणि राज्याचे धर्मकारण आणि राजकारण बदलून गेलं. आज आमचा छावा राजकारणात आला. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण मातोश्रीभोवतीच केंद्रीत राहील.”

इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे

बाळासाहेब ठाकरे स्वतः असते तर त्यांनाही हा क्षण पाहताना खूप आनंद झाला असता असंही राऊत यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “ठाकरे कुटुंबातील कुणी निवडणूक लढणार नाही असं म्हणतात. अशी एक दंतकथा आहे. मला अनेकांनी हा प्रश्न विचारला. मी त्यांना हेच सांगतो की हे जरी सत्य असलं तरी इतिहास घडवताना कधी कधी नियम बाजूला ठेवायचे असतात.”

शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा त्यांनी देखील राजकारणात उतरणार नाही, निवडणूक लढणार नाही असं ठरवलं होतं. नंतर त्यांनाही समाजकारण व्यवस्थित करण्यासाठी राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं. मागील 50 वर्ष हे राजकारण सुरू आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं.

हा माहोल बघून मिस्टर ट्रम्प प्रचाराला येतील

यावेळी राऊत यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून बोलताना मोदींनाही टोला लगावला. ते म्हणाले, “हा निवडणुकीचा आणि प्रचाराचा माहोल पाहून भविष्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील आपल्याला प्रचारासाठी बोलवतील. त्यावेळी आम्ही देखील घोषणा देऊ हाऊडी अॅडी.” यावेळी राऊत यांनी नुकत्याच मोदींच्या ट्रम्पसोबतच्या सभेचा आधार घेतला.

महाराष्ट्रात थिणगी पडली, की देशात वणवा पेटतो

राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात ठिणगी पडली, की देशात वणवा पेटतो हा इतिहास आहे. आदित्य ठाकरेंनी ठिणगी टाकली आहे. या ठिणगीचा वणवा महाराष्ट्रात देशात झाल्याशिवाय राहणार नाही.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *