वेळ आहे, तर ‘सामना’ वाचून फडणवीसांनी प्रगल्भ व्हावं, संजय राऊतांचे चिमटे

'सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे. झोपेतसुद्धा फडणवीसांना आता 'सामना' दिसेल', असा टोला संजय राऊतांनी लगावला.

वेळ आहे, तर 'सामना' वाचून फडणवीसांनी प्रगल्भ व्हावं, संजय राऊतांचे चिमटे

नागपूर : विधीमंडळात ‘सामना’ वृत्तपत्र वाचून दाखवत शिवसेनेने शरद पवारांवर केलेल्या टीकेकडे लक्ष वेधणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आता वेळ आहे, तर फडणवीस ‘सामना’ वाचतील अधिक प्रगल्भ होतील. ‘सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे. झोपेतसुद्धा त्यांना आता ‘सामना’ दिसेल’, असा टोला राऊतांनी (Sanjay Raut on Devendra Fadnavis) लगावला.

भाजप आणि नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्यावरही ‘सामना’तून कौतुकाचा वर्षाव केला होता, तेही फडणवीसांनी वाचून दाखवावे, फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राला ज्या अपेक्षा होत्या, त्याही त्यांनी वाचून दाखवाव्यात, असं संजय राऊत म्हणाले.

सामना हे एक वृत्तपत्र आहे. प्रसंगानुसार त्या-त्या वेळी भूमिका घेतलेल्या येत-जात असतात. ‘सामना’ हा संताजी धनाजी प्रमाणे आहे. झोपेतसुद्धा आता माजी मुख्यमंत्र्यांना तो दिसेल. मुख्यमंत्री असताना त्यांना वेळ मिळाला नाही. आता वेळ आहे, ते ‘सामना’ वाचतील अधिक प्रगल्भ होतील. विचार करण्याची सुबुद्धी निर्माण होईल आणि त्यातून काही विधायक घडेल याची
मला खात्री असल्याचं संजय राऊत म्हणाले.

‘सामना’चा अभ्यास करा आणि तो पूर्ण झाल्यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असंही राऊतांनी (Sanjay Raut on Devendra Fadnavis) सुचवलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शिवसेनेने शरद पवारांवर केलेल्या टीकेकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधलं. इतकंच नाही तर या सरकारला जनादेश नाही, जनादेश भाजपला आहे, स्वार्थासाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांनी सरकार स्थापन केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसताना, बाहेरील व्यक्तीबाबत इथे भाष्य करणं योग्य नाही, असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी नमूद करत फडणवीसांवर आक्षेप घेतला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही बाहेरील व्यक्तीबाबत भाष्य करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. यानंतरही फडणवीसांचं भाषण सुरु राहिलं.

सभागृहात ‘सामना’ वाचत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला, पवारांवरील टीकेची आठवण

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, पण त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बनवणार का? हा शब्द दिला होता का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

एकनाथ शिंदे यांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या या हल्ल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी म्हणाले की मी हा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला असता. मी अपघाताने मुख्यमंत्री झालो. आमच्या मित्रपक्षांनी जर शब्द पाळला असता, तर ही वेळ आली नसती”

शिंदेंच्या या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या पहिल्या पत्रकार परिषदेची आठवण करुन देत, सर्व पर्याय खुले असल्याचं विधान सांगितलं.

त्यावर एकनाथ शिंदे यांनी गोवा, मणिपूरमध्ये भाजपने काय केलं? अशी विचारणा केली. त्यावर फडणवीसांनी त्या राज्यांमध्ये आम्ही एकत्र लढलो नव्हतो, एकत्र मतं मागितली नव्हती, मात्र महाराष्ट्रात आम्ही एकत्र लढलो, एकत्र मतं मागितली होती, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Sanjay Raut on Devendra Fadnavis

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI