जावई विरोधात असतानाही 70 हजारांचा लीड : शिवाजी कर्डिले

लोकसभेला अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

जावई विरोधात असतानाही 70 हजारांचा लीड : शिवाजी कर्डिले

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जावई विरोधात असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड मिळवून दिला होता. नाचता येईना अंगण वाकडे, या वृत्तीमुळे टीकाकार बोलतात, अशा शब्दात अहमदनगरच्या राजकारणातील किंगमेकर आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile on Sangram Jagtap) यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा कर्डिले यांनी केला आहे. काही जणांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आहे. त्यामुळे माझ्यावर ते आरोप करतात. रात्री दोन वाजेपर्यंत जागून सकाळी 12 वाजता उठणारी हीच ती माणसं आहेत, असा टोलाही शिवाजी कर्डिले यांनी (Shivaji Kardile on Sangram Jagtap) विरोधकांना लगावला.

घरात सगळं आलबेल आहे, हे सांगावं लागतं, म्हणजेच पवार कुटुंबात गडबड आहे : सुरेश धस

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर सुजय विखे पाटील खासदारपदी निवडून आले. तर राष्ट्रवादीने तिकीट दिलेल्या संग्राम जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जगताप आता पुन्हा अहमदनगर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात अनिल राठोड यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.

निवडणुकीच्या काळात प्रक्रियेचा भाग म्हणून मी प्रचार करतो. खरं तर निवडून आल्यानंतर लगेच माझा प्रचार सुरु होतो. सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत माझा जनतेशी संपर्क असतो. दर आठवड्याला जनता दरबार भरतो. त्यामुळे मला कुठलीही अडचण वाटत नाही, असं शिवाजी कर्डीले म्हणाले. अहमदनगरमधील इतर मतदारसंघातही भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मी निवडून आणेन, असा विश्वास शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केला.

संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले यांची कन्या शीतल जगताप यांचे पती. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप राष्ट्रवादीच्या तिकीटावर अहमदनगर शहर मतदारसंघातून निवडून आले होते. तर शीतल जगतापही अहमदनगर महापालिकेत नगरसेविका आहेत.

2017 मध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात व्यत्यय आणत विधानसभेबाहेर बजेटच्या प्रती जाळल्याप्रकरणी संग्राम जगतापांसह 18 आमदारांना डिसेंबर अखेरपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं. 7 एप्रिल 2018 रोजी अहमदनगरमध्ये दोघा शिवसैनिकांची हत्या केल्याच्या आरोपातून संग्राम जगताप यांना अटक झाली होती.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI