मोदींच्या ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेखाला सन्मान समजणाऱ्यांची सोशल मीडियावर फिरकी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:39 PM, 13 May 2019
मोदींच्या ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेखाला सन्मान समजणाऱ्यांची सोशल मीडियावर फिरकी

नवी दिल्ली : अमेरिकेचे प्रसिद्ध ‘टाईम’ (TIME) मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ही चर्चा अनेक कारणांनी होत आहे. त्यातील एक कारण मोदी समर्थकांनी मोदींसाठी वापरलेल्या ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेखाला मोदींचा सन्मान समजल्याचेही आहे. यावरुन सोशल मीडियावर युजर्सकडून मोदी समर्थकांची चांगलीच फिरकी घेतली जात आहे.


टाईम मॅगझिनने याआधी मार्च 2012 आणि मे 2015 मध्ये देखील आपल्या कव्हर पेजवर मोदींना स्थान दिले होते. या वर्षी टाईमने मोदींचा फोटो कव्हर पेजवर देताना ‘डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच भारतातील प्रमुख विभाजनकारी असा उल्लेख केला. त्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आले. काही मोदी समर्थकांनी ‘डिव्हायडर इन चीफ’ या मथळ्याखाली लेख लिहिलेल्या पत्रकाराच्या नागरिकत्वावरुनही टीका केली. दुसरीकडे काहींनी म्हटले, की कव्हर पेजवर काय ठेवायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्य संपादकांना असतो, त्यामुळे लेख लिहिणारा पत्रकार पाकिस्तानचा आहे म्हणून त्याच्यावर टीका करणे चुकीचे आहे.

सोशल मीडियावर उमेश रंजन साहू नावाच्या एका व्यक्तीने शुक्रवारी (10 मे) रात्री ट्विटर आणि फेसबूकवर एक फोटो पोस्ट केला. त्यात टाईम मॅगझिनचे कव्हर पेज दिसत असून त्यात ‘मोदी है तो नामुमकिन मुमकिन है’ असे लिहिले आहे. त्याखाली उजव्या कोपऱ्यात त्या व्यक्तीने स्वतःचा फोटो टाकत अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स मॅगेझिनने मोदींना सन्मानित केल्याचे म्हटले. तसचे यासाठी मोदींना शुभेच्छाही दिल्या. यानंतर सोशल मीडिया युजर्सने या पोस्टवरुन उमेशला चांगलेच ट्रोल केले. उमेश साहू यांना याची माहिती मिळताच त्यांनी 2 तासात ही पोस्ट ट्विटर आणि फेसबूकवरुन डिलिट केली. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक युजर्सने त्याचे स्क्रिनशॉट्स शेअर केले.

उमेश रंजन साहू व्यतिरिक्त महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनीही अशाचप्रकारे मोदींना शुभेच्छा देत ‘पीएम मोदी का डंका पूरी दुनिया में’ असे लिहिले. त्यांचीही युजर्सने फिरकी घेत थट्टा उडवली. काही युजर्स या प्रकाराला मोदींची अंधभक्ती म्हणत आहेत.