महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या घटना, लिफ्टमध्ये उद्धव ठाकरेंसोबत भाजपचा बडा नेता, दुसरी घटना कोणती?; काय घडतंय?
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज लिफ्टमध्ये भेटले. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. लोकसभा निवडणुकीतील भाजपचा झालेला पराभव आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेलं नेत्रदीपक यश या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे दुसरे महत्त्वाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आज विधानभवनात आले होते. उद्धव ठाकरे विधान भवनात येताच ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी पेढे वाटण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केला. त्यानंतर ते विधानभवनात जायला निघाले.
उद्धव ठाकरे हे विधान भवनातवरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते. तिथे त्यांची अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. बातचीत केली. त्यानंतर दोन्ही नेते लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं सांगितलं जातं. पण काय संवाद झाला यावर कुणीही भाष्य केलं नाही. परंतु, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र लिफ्टमधून गेल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षाही आपली ताकद मोठी असल्याचं दाखवून दिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे.
दुसरी मोठी घटना
या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. भाजपचे दुसरे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि दानवे यांना चॉकलेट दिलं. चंद्रकांत पाटील स्वत:हून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिरसाट काय म्हणाले?
दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला आज विधानभवनात सर्व आमदार भेटले. आम्ही गप्पा मारल्या. शेवटी आमच्यात मैत्रीचा धाका आहे, असं सांगतानाच आम्ही उद्धव ठाकरे यांना चॉकलेट भरवलं. भविष्यात अनेक लोकं आमच्याकडे येतील. आम्ही कुणालाही जबरदस्तीने बोलावणार नाही. ज्यांना यायचं त्यांचं स्वागत करू. भविष्यात महायुतीचेच दिवस असतील. महायुतीचंच सरकार येईल, असं संजय शिरसाट म्हणाले. लिफ्टमध्ये काय घडलं? हे फडणवीस आणि ठाकरेंना माहीत आहे. त्यांनी एकमेकांना डोळे मारले असतील, असंही ते म्हणाले.
सहज भेटले, सर्वच चर्चा…
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सर्वांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. सर्वांना वाटतं उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत. उद्धव ठाकरे यांनी आधीही राज्याचं नेतृत्व केलं आहे, असं सांगतानाच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणं स्वाभाविक होणं, त्यांच्यात चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नसेल. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सर्व मानत आहेत. दोघच लिफ्टमधून गेले. पण सर्व चर्चा लोकांसमोर येत नाही. त्यांची सहज भेट झाली. त्यात नवीन काही नाही, असं वैभव नाईक म्हणाले.
