शिवसेनेच्या नेतृत्त्वातील युतीला अजित पवारांचा विरोध का?; ‘ट्रेडिंग पॉवर’मधील खळबळजनक दावे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र सरकार स्थापन करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून त्यावेळच्या पडद्यामागील घडामोडींची इनसाईड स्टोरी उघड झाली आहे. (why ajit pawar opposed shivsena, inside story of early morning oath ceremony)

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:12 PM, 25 Nov 2020

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र सरकार स्थापन करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून त्यावेळच्या पडद्यामागील घडामोडींची इनसाईड स्टोरी उघड झाली आहे. त्यानुसार अजित पवार हे शिवसेनेसोबत युती करण्यास तयार नव्हते. त्यांचा या युतीला विरोध होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. (why ajit pawar opposed shivsena, inside story of early morning oath ceremony)

लेखिका प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकातून फडणवीस-पवार यांच्या शपथविधीच्या पडद्यामागील घडामोडींबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यात अजित पवारांचा शिवसेनेसोबत जाण्यास सुरुवातीपासूनच विरोध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच अजितदादांनी फडणवीसांसोबत हात मिळवणी केल्याचा दावाही या पुस्तकात केला आहे. अजितदादांचा शिवसेनेला असलेला विरोध तात्विक आणि राजकीय कारकिर्दीच्या अनुषंगाने असल्याचं या पुस्तकात अधोरेखित करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेऊन चूक करत असल्याचं अजितदादाचं मत होतं. राजकारणात अजून दहा वर्षे रहावं लागणार असल्याने सेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचंच नुकसान होऊ शकतं, असं अजित पवारांना वाटत होतं. शिवाय आपल्या राजकीय कारकिर्दीला भविष्यात या निर्णयाचा फटका बसू शकतो, असंही अजितदादांना वाटत असल्याचं या पुस्तकातील एका नेत्यांच्या हवाल्यावरून सांगण्यात आलं आहे.

संवाद काय सांगतो?

या पुस्तकात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणि फडणवीस यांचा संवाद दिला आहे. त्यावरून अजितदादांच्या मनातील खदखद व्यक्त होत आहे. ‘देवेंद्रजी, बरेच आमदार शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देतील. सेनेला पाठिंबा देऊन शरद पवार चूक करताहेत, असं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं–म्हणजे आमचं मत आहे. सुप्रियाताईंना वगळून. परंतु, पवारसाहेब आमचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीयेत,’ राष्ट्रवादीचा सदस्य म्हणाला.

थोडं थांबून तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही जे ठरवलंय ते प्रत्यक्षात खरं करून दाखवू शकेल असा एकच माणूस म्हणजे अजितदादा. शिवसेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकारला अजितदादांचा ठाम विरोध आहे. दादा राजकारणात अजून दहा-एक वर्षं असणार आहेत. कदाचित जास्त. सेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि आपल्या (म्हणजे अजितदादांच्या) कारकिर्दीलाही अपाय होईल, असं त्यांचं मत आहे.’

या संवादावरून अजितदादा शिवसेनेसोबत जाण्यास इच्छूक नसल्याचं अधोरेखित होत आहे. मात्र, या पुस्तकात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचं नाव छापण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुस्तकातील या दाव्यांवरही प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.

पवारांची खेळी

एकीकडे अजित पवारांना त्यांच्या पुढच्या दहा वर्षाच्या राजकीय करिअरची चिंता लागलेली होती, तर दुसरीकडे शरद पवारांनीही आपली राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निश्चय केल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे. त्याशिवाय शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यास राज्याची सत्ता आपल्याच हाती येईल, असा पवारांचा अंदाज होता. त्यामुळे भाजपसोबत जाऊन मित्र पक्ष बनून राहण्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्यावर शरद पवारांनी भर दिल्याचा दावाही या पुस्तकातून करण्यात आला आहे. (why ajit pawar opposed shivsena, inside story of early morning oath ceremony)

 

संबंधित बातम्या:

PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो 

पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

(why ajit pawar opposed shivsena, inside story of early morning oath ceremony)