विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… आषाढी एकादशीचा शुभ मुहुर्त काय?
आषाढी एकादशी २०२५ च्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये जमलेल्या लाखो वारकऱ्यांचे विठ्ठल नामाच्या गजराने भक्तीमय वातावरण पाहायला मिळते. आज या लेखातून आपण आषाढी एकादशीचे महत्त्व, तिथी, आणि शुभ मुहूर्तांची माहिती घेणार आहोत.

हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून आषाढी एकादशीला ओळखले जाते. आज ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. कारण याच दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेला जातात अशी धार्मिक मान्यता आहे.
हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी 5 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी सुरु झाली आहे. त्यानंतर 6 जुलै 2025 रविवारी रोजी रात्री 9 वाजून 14 मिनिटांपर्यंत आषाढी एकादशीची तिथी राहील. उदय तिथीनुसार, आषाढी एकादशीचे व्रत 6 जुलै रविवारी पाळावे. भाविक या दिवशी उपवास करतात. विठ्ठलाची भक्ती करतात. तसेच चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात. आषाढी एकादशीनिमित्त हजारो वारकरी अनेक दिवस वारी करुन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला येतात.
शुभ मुहूर्त काय?
आषाढी एकादशीच्या दिवशी विविध शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत, ज्यात धार्मिक कार्ये आणि पूजा-अर्चा केली जाऊ शकते:
- ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:08 ते 04:49 पर्यंत
- अभिजीत मुहूर्त: दुपारी 11:58 ते 12:54 पर्यंत
- विजय मुहूर्त: दुपारी 02:45 ते 03:40 पर्यंत
- गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 07:21 ते 07:42 पर्यंत
- अमृत काल: दुपारी 12:51 ते 02:38 पर्यंत
- त्रिपुष्कर योग: रात्री 09:14 ते 10:42 पर्यंत
- रवि योग: सकाळी 05:56 ते रात्री 10:42 पर्यंत
लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल
आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी महाराष्ट्रात उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून “विठू नामाचा गजर” दुमदुमतोय. पंढरपूरमध्ये तर विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर १८ ते २० लाख वारकरी आणि भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.