विश्वचषकात सिलेक्टर्स चहाचे कप उचलायचे, अनुष्काच्या संतापानंतर क्रिकेटपटूचा माफीनामा

टीम इंडियाचे सिलेक्टर्स अनुष्का शर्माच्या चहाचे कप उचलत होते, असा आरोप फारुख इंजिनिअर यांनी केल्यानंतर अनुष्काने मौन सोडलं

विश्वचषकात सिलेक्टर्स चहाचे कप उचलायचे, अनुष्काच्या संतापानंतर क्रिकेटपटूचा माफीनामा

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निवड समितीमधील सदस्य हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) पत्नीच्या चहाचे कप उचलत खास बडदास्त ठेवत होते, असा आरोप माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) यांनी केल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने मौन सोडलं (Anushka Sharma Twitter Post) आहे. माझं नाव यात विनाकारण गोवण्याची गरज नव्हती, अशा शब्दात अनुष्काने आपला राग व्यक्त केला आहे. अनुष्काचा भडका उडाल्यानंतर फारुख इंजिनिअर यांनी तिची सपशेल माफी मागितली आहे.

निवड समितीमधील सदस्य अक्षरशः अनुष्काच्या चहाचे कप उचलत असायचे, असा दावा फारुख इंजिनिअर यांनी केला होता. त्यानंतर अनुष्काने इंजिनिअर यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला निवड समितीवर टीका करायची असेल, तर खुशाल करा, पण विनाकारण माझं नाव मध्ये ओढण्याची काहीच गरज नाही, असं अनुष्काने ट्विटरवर लिहिलं आहे.

‘मी नेहमीच आपल्यावरील आरोपांवर गप्प बसणं पसंत केलं आहे. पण एखादं खोटं वारंवार ओरडून सांगितल्यानंतर खरं वाटायला लागतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळचा माझा बॉयफ्रेण्ड आणि आताचा नवरा विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवरुन मला नावं ठेवली गेली. तरी मी गप्प बसले. टीम इंडियाच्या बंद दाराआड होणाऱ्या चर्चांचा भाग असल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला. परदेश दौऱ्यात मी विराटसोबत अतिरिक्त काळ राहिल्याचाही आरोप झाला, तरी मी काही बोलले नव्हते’ असं अनुष्का म्हणते.

‘माझं विमान तिकीट, सामन्याचं तिकीटही मीच काढायचे. माझ्या सुरक्षेसाठी टीम इंडियाकडून कोणीही तैनात करण्यात आलं नव्हतं. उच्चायुक्तांच्या पत्नीने मला फोटोमध्ये उभं राहण्यास सांगितलं होतं. मी वारंवार नकार देऊनही केवळ त्यांच्या आग्रहास्तव फोटोत राहिले’ असंही अनुष्काने (Anushka Sharma Twitter Post) सांगितलं.

‘यावर कडी म्हणजे ताजे दावे, की टीम इंडियाचे सिलेक्टर्स मला चहा द्यायचे. मी सिलेक्टर्सच्या नाही, तर फॅमिली बॉक्समध्ये बसून एकच सामना पाहिला होता. तुम्हाला निवड समितीला नावं ठेवायची आहेत, तर ठेवा. पण मला विनाकारण यामध्ये गोवू नका.’ असं अनुष्काने सुनावलं.

‘असा प्रसंग खरंच घडला होता पण, मला अनुष्कावर टीका करायची नव्हती. ती एक चांगली मुलगी आहे. अनुष्का आणि विराट कोहली रोल मॉडेल्स आहेत. तिला राग आला असेल, तर मी तिची माफी मागतो. मला फक्त निवड समिती, त्यांच्या कार्यपद्धतीशी अडचण आहे, विराट-अनुष्काविषयी तक्रार नाही,” अशा शब्दांत त्यांनी अनुष्काची माफी मागितली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *