Asia Cup 2025 : आयपीएलमध्ये वेगवान शतक करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आशिया कपमध्ये संधी?
Team India Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशी याने कमी वयात मोठा कारनामा करुन दाखवलाय. वैभवने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेसाठी वैभवच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

बीसीसीआय निवड समितीने आतापर्यंत बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. या स्पर्धेचा 9 सप्टेंबरपासून श्रीगणेशा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघामध्ये चढाओढ असणार आहे. भारतीय संघाच्या घोषणेआधी 1983 वर्ल्ड कप विजयी संघातील खेळूाडू आणि माजी सलामीवीर के श्रीकांत यांनी आशिया कप स्पर्धेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत यांनी या स्पर्धेसाठी त्यांची आवडीच्या सलामी फलंदाजांची नावं सांगितली आहेत. के श्रीकांत यांच्या सलामी जोडीमध्ये संजू सॅमसन याचं नाव नाही.
वैभव सूर्यवंशी खेळणार?
के श्रीकांत यांनी आशिया कप स्पर्धेत ओपनिंग जोडी म्हणून यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा साई सुदर्शन आणि वैभव सूर्यवंशी यांच्या नावांना पसंती दिली आहे. तर श्रीकांत यांनी संजूला डच्चू दिला आहे. श्रीकांत यांच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रीकांत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना याबाबत भाष्य केलं.
अभिषेक शर्मा श्रीकांत यांची ओपनर म्हणून पहिली पसंत आहे. अभिषेकची ओपनर म्हणूनच निवड व्हावी, असं श्रीकांत यांनी म्हटलं. तसेच अभिषेकसोबत ओपनिंगसाठी यशस्वी, वैभव आणि साई या तिघांपैकी कोणत्या एकाची निवड करण्याचा सल्ला श्रीकांत यांनी दिला आहे.
संजूला डच्चू का?
श्रीकांत याच्यानुसार संजू ओपनिंगसाठी दावेदार नाही. संजूला इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिकेत शॉर्ट बॉलवर संघर्ष करावा लागला होता, त्यामुळे श्रीकांत यांनी संजूच्या नावावर ओपनर म्हणून फुली मारलीय.
के श्रीकांत काय म्हणाले?
“संजू सॅमसन इंग्लंड विरुद्ध शॉर्ट बॉलवर काही खास करु शकला नाही. माझ्या हिशोबाने संजूला ओपनिंगची संधी मिळणं अवघड आहे. मी निवड समितीत असतो तर अभिषेक शर्माला प्रथम प्राधान्य दिलं असतं. तर ओपनिंग पार्टनर म्हणून वैभव सूर्यंवशी आणि साई सुदर्शन या दोघांपैक एकाला संधी दिली असती”, असं श्रीकांत त्यांच्या ‘चीकी चीका’ या युट्यूब चॅनेलवर म्हणाले.
वैभवला संधी देण्याची मागणी
“मी माझ्या 15 सदस्यीय संघात वैभव सूर्यवंशी याला संधी देईल. तो चांगला खेळतोय. साई सुदर्शन ऑरेंज कॅप विजेता आहे. तसेच यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे साई, वैभव आणि यशस्वी या तिघांपैकी कुणी एकाने अभिषेकसह सलामीला यायला हवं. तसेच विकेटकीपर बॅट्समन म्हणून सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांपैकी एकाची निवड केली जाऊ शकते”, असंही के श्रीकांत यांनी म्हटलं.
दरम्यान वैभवने 18 व्या मोसमातून राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने या पहिल्याच हंगामात इतिहास रचला. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षीच आयपीएलमध्ये शतक ठोकलं. वैभव यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला आणि युवा फलंदाज ठरला.
