Asia Cup 2025 स्पर्धेत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार, नक्की काय?
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेची क्रिकेट चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. यंदा या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र यंदा या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना 2 खेळाडूंची उणीव भासणार आहे. जाणून घ्या.

बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार 28 सप्टेंबरपर्यंत रगंणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघामध्ये मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या आशिया कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच यंदा या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 वर्षांनतर वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. यंदा या स्पर्धेत 2 दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे.
आशिया कपमध्ये यंदा 21 वर्षानंतर पहिल्यांदाच 2 खेळाडूंची उणीव भासणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाचे हे 2 अनुभवी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांची निवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे या दोघांशिवाय 21 वर्षानंतर आशिया कप स्पर्धा होणार आहे. याआधी 2004 साली या दोघांशिवाय आशिया कप स्पर्धेचा थरार रंगला होता. मात्र तेव्हा या दोघांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं नव्हतं. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक आशिया कप स्पर्धेत विराट आणि रोहित सहभागी झाले होते.
तसेच त्यानंतर झालेल्या प्रत्येक आशिया कप स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांपैकी किमान कुणा एकाने तरी सहभाग घेतला होता. विराट आणि रोहित हे भारतीय संघाचे गेल्या 2 दशकांमधील आधारस्तंभ राहिले आहेत. या दोघांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत असंख्य वेळा भारताला एकहाती सामने जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. विराटने कर्णधार आणि फलंदाज म्हणून असंख्य विक्रम केले. मात्र विराट दुर्देवाने त्याच्या नेतृत्वात भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरला. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याने भारताला टी 20i वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली.
तसेच रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 2018 साली आशिया कप जिंकून दिला होता. तसेच 2023 साली अखेरीस भारतानेच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा विराट कोहली आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात होता. मात्र आता या दोघांची क्रिकेट चाहत्यांना उणीव भासणार इतकं मात्र नक्की.
