IND vs PAK Super 4 : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यापैकी कोण जिंकणार? साडे सात वाजता ठरणार!
India vs Pakistan Super 4 Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेत 14 सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकणार? जाणून घ्या अंदाज.

टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला सुरुवात झाली आहे. सुपर 4 फेरीत 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. सुपर 4 फेरीतील एकूण दुसऱ्या तर ए ग्रुपधील पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे. हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. उभयसंघात 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने मात केली होती. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. तर ओमानवर मात करत भारताने विजयी हॅटट्रिक लगावली होती. त्यामुळे भारताचा सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याचा प्रयत्न असणार आहे.
तर साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा भारतावर मात करत गेल्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत कोणता संघ विजयाने सुरुवात करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र हा सामना कोणता संघ जिंकणार? हे सामना सुरु होण्याच्या 30 मिनिटांआधीच ठरणार आहे, ते कसं? हे जाणून घेऊयात.
दुबईत टॉस फॅक्टर महत्त्वाचा
उभयसंघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. या मैदानात टॉस किती महत्त्वाचा आहे हे येथील आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.
दुबईतील आकडेवारी काय सांगते?
आतापर्यंत दुबईत एकूण 9 टी 20 सामन्यांमध्ये विजयी आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे रविवारी टॉस जिंकणारा संघ फिल्डिंग घेणार की बॅटिंग? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गेल्या सामन्यात काय झालं होतं?
दरम्यान या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ साखळी फेरीत आमनेसामने होते. उभयसंघात रविवारी 14 सप्टेंबरला सामना झाला होता. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानला 127 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे भारताने 128 धावांचं आव्हान 7 विकेट्सआधी पूर्ण केलं होतं. भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 131 रन्स करत विजय मिळवला होता.
