IND vs SL Super Over : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात, विजयी झंझावात कायम, पाथुम निसंकाची शतकी खेळी व्यर्थ
India vs Sri Lanka, Super 4 Super Over Match Result : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यासह आशिया कप 2025 स्पर्धेत सलग सहावा विजय साकारला आहे.

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सहाव्या आणि अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेलाही प्रत्युत्तरात पाथुम निसांका याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 202 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. टीम इंडियाने त्यानंतर श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये 2 धावांवर 2 झटके देत ऑलआऊट केलं. टीम इंडियाने त्यानंतर 3 धावांचं आव्हान हे पहिल्याच बॉलवर पूर्ण केलं. यासह भारताने एकूण आणि सलग सहावा विजय मिळवला. टीम इंडियाने यासह सुपर ओव्हरमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवला.
त्याआधी पाथुम निसांका याचं शतक आणि कुसल परेरा याच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 203 धावांचा पाठलाग करताना 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावा केल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेला अंतिम ओव्हरमध्ये 12 धावांची गरज होती. हर्षित राणा याने शेवटची ओव्हर टाकली. पाथुम निसांका पहिल्याच बॉलवर आऊट झाला. हर्षितच्या बॉलिंगवर वरुण चक्रवर्ती याने पाथुमचा अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे आता श्रीलंकेला 5 बॉलमध्ये 12 हव्या होत्या. हर्षितने टाकलेल्या पुढील 4 बॉलमध्ये दासून शनाका आणि जनिथ लियानगे या जोडीने 9 रन्स केल्या. त्यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलवर अक्षर पटेल याच्याकडून मिस फिल्डिंग झाली. त्यानंतरही श्रीलंकेच्या जोडीला 2 धावाच करता आल्या. यासह दोन्ही संघांच्या समसमान धावा झाल्या आणि मॅच टाय झाली.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. श्रीलंकेसाठी पाथुम निसांका याने 58 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 7 फोरस 107 रन्स केल्या. पाथुमचं टी 20i कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. मात्र पाथुमचं शतक व्यर्थ ठरलं. पाथुम व्यतिरिक्त कुसल परेरा याने 58 धावांची खेळी केली. त्याआधी कुसल मेंडीस याला भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन चरिथ असलंका याने 5 आणि कामिंदु मेंडीस याने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अखेरच्या क्षणी दासून शनाका आणि जनिथ लियानगे या जोडीने श्रीलंकेला विजयी करण्यासाठी जंग जंग पछाडलं. मात्र ही जोडी 1 धाव करण्यात अपयशी ठरली आणि सामना बरोबरीत सुटला. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या 5 गोलंदाजांनी 1-1 विकेट मिळवली.
सामना बरोबरीत, सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया विजयी
Unbeaten run in the #AsiaCup2025 continues 🙌
On to the #Final 💪 🔜
Scorecard ▶️ https://t.co/FSv1q3IqCa#TeamIndia | #Super4 | #INDvSL pic.twitter.com/cNacwS1jJh
— BCCI (@BCCI) September 26, 2025
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या तिघांनी दिलेल्या सर्वाधिक धावांच्या योगदानामुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये 202 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियासाठी अभिषेकने सर्वाधिक 61 धावा केल्या. संजू सॅमसन याने 39 धावा जोडल्या. तर तिलक वर्मा याने आणि अक्षर पटेल ही जोडी नाबाद परतली. तिलकने 49 आणि अक्षरने 21 धावा केल्या. तर इतरांच्या मदतीने भारताने 202 धावा केल्या. तसेच टीम इंडियाप्रमाणेच श्रीलंकेच्याही 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
