AUS vs IND : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, कांगारुंचा 48 धावांनी धुव्वा
Australia vs India 4th T20i Match Result : टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. मात्र भारताने सांघिक खेळीच्या जोरावर सलग 2 सामने जिंकत मालिकेवर 1 हात ठेवला आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी 20I सामन्यात 48 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियसमोर 168 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र कांगारुंना भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 18.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह या मालिकेतील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताची मालिका विजयाची संधी वाढली आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर पाचव्या आणि अंतिम सामन्यात मालिका बचावण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल
शुबमन गिल याच्या 46 आणि अभिषेक शर्माच्या 28 धावांच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 रन्स केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू शॉर्ट आणि कॅप्टन मिचेल मार्श या सलामी जोडीने 37 धावांची भागीदारी मिळवून दिली. अक्षर पटेल याने मॅथ्यू शॉर्ट याला 25 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला.
त्यानंतर मार्शने आणि जोश इंग्लिससह दुसऱ्या विकेटसाठी 30 रन्स जोडल्या. अक्षरने जोशला 12 रन्सवर बोल्ड करत कांगारुंना एकूण आणि सलग दुसरा झटका दिला. त्यानंतर भारताने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. ऑस्ट्रेलियाला यातून सावरताच आलं नाही.ऑस्ट्रेलियासाठी मार्शने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला 20 पारही पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या 5 पैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर दोघांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.
भारताचे सर्व गोलंदाज यशस्वी
टीम इंडियासाठी फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक 6 तर वेगवागन गोलंदाजांनी 4 विकेट्स मिळवल्या. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाची बॅटिंग
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 56 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर भारताने 64 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. या दरम्यान शिवम दुबे याने 20 तर सूर्याने 22 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी अक्षर पटेल याने 21 धावांची निर्णायक खेळी केली. वॉशिंग्टन सुंदर याने 12 रन्स केल्या. मात्र इतर एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी एडम झॅम्पा आणि नॅथन एलीस या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाकडे हॅटट्रिकसह मालिका विजयाची संधी
दरम्यान इंडिया क्रिकेट टीमला आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी मालिकेच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा असणार आहे. हा सामना शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे.
