ENG vs IND : इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या सरावाला सुरुवात, 18 वर्षांची प्रतिक्षा संपवण्यासाठी यंग ब्रिगेड सज्ज
India Tour Of England 2025 : टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे. उभयसंघात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या हंगामाचा थरार संपल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल या मालिकेपासून टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या 3 अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर युवा ब्रिगेड कशाप्रकारे कामगिरी करते? त्यात किती यश मिळतं? याकडे टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया अवघ्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडला पोहचली. त्यांनतर आता टीम इंडियाच्या सराव शिबिराला 8 जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र कर्णधार शुबमनसमोर 5 प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचं आव्हान असणार आहे. ती 5 प्रश्न नक्की कोणती? याबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या सरावाला सुरुवात
टीम इंडियाने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने सराव शिबिराचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या दरम्यान काही खेळाडू रनिंग करताना दिसत आहे.
टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. करुण नायर याने इंग्लंड लायन्स विरुद्ध पहिल्या अनऑफीशियल टेस्टमध्ये द्विशतक झळकावलं. तर केएल राहुल याने दुसऱ्या अनऑफिशियल टेस्टमध्ये शतक ठोकलं. या दोघांची इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये अशीच कामगिरी करण्याची इच्छा आणि प्रयत्न असणार आहेत. तसेच करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन या तिघांपैकी कुणाला तिसऱ्या स्थानी बॅटिंगची संधी दिली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्णधार शुबमन गिल कोणत्या स्थानी खेळणार? हा एक प्रश्न आहे. शुबमन तिसऱ्या स्थानीच खेळत राहणार की विराट कोहलीच्या जागी (चौथ्या स्थानी) बॅटिंगसाठी येणार? हा प्रश्न गिलसमोर आवासून उभा आहे.
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने तो फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार आहे, हे स्पष्ट केलंय. मात्र त्यानंतरही बुमराह फिटनेसमुळे किती सामने खेळू शकतो? हा देखील मोठा प्रश्न आहे.
इंग्लंडमधील स्थिती वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना संधी कमी मिळणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कुलदीपला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच स्पिन ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा खेळणार असल्याचं निश्चित आहे.
विकेटकीपर ऋषभ पंत याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे ध्रुव जुरेल याला संधी मिळणार का? टीम इंडिया ध्रुव जुरेल याला फलंदाज म्हणून खेळवणार का? हा देखील प्रश्न आहे.
