ENG vs IND : दुसरा दिवस इंग्लंडचा, टीम इंडिया विरुद्ध 209 धावा, ओली पोपचं शतक, तिसऱ्या दिवशी यजमानांना रोखण्याचं आव्हान
England vs India 1st Test 2nd Day Highlighs In Marathi : इंग्लंडने जोरदार कमबॅक करत दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर तिसऱ्या दिवशी इंग्लंडला आघाडी मोडीत काढण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. यजमान इंग्लंडने दमदार कामगिरी करत दुसरा दिवस आपल्या नावावर केला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या. भारताने यासह पहिला दिवस आपल्या नावावर केला. मात्र इंग्लंडने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. इंग्लंडने भारताला झटपट 7 झटके देत पहिल्या डावात 471 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 49 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड अजूनही 262 धावांनी पिछाडीवर आहे. ओली पोप याने इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह यानेच तिन्ही विकेट घेतल्या. मात्र दुसऱ्या बाजूने बुमराहला गोलंदाजांसह खेळाडूंकडूनही चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यात कायम राहायचं असेल तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करावं लागेल.
दुसऱ्या दिवशी काय झालं?
टीम इंडियाने 359 धावांपासून दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या दोघांनी टीम इंडियाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या दिवशी आणखी 71 धावा जोडल्या. गिल-पंत जोडीने चौथ्या विकेटसाठी विक्रमी 209 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन आऊट झाला. शुबमनने 147 धावा केल्या. शुबमनसह भारताची घसरगुंडी झाली. भारताने शेवटच्या 7 विकेट्स अवघ्या 41 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. टीम इंडिया अशाप्रकारे पहिल्या डावात 113 ओव्हरमध्ये 471 रन्सवर ऑलआऊट झाली.
भारतासाठी गिल व्यतिरिक्त ऋषभ पंत याने 134 तर ओपनर यशस्वी जैस्वाल याने 101 धावांची खेळी केली. मात्र तिघांच्या शतकानंतरही भारताला 500 धावाही करता आल्या नाहीत. केएल राहुल याने 42 धावांचं योगदान दिलं. डेब्यूटंट साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह या तिघांना भोपळा फोडता आला नाही. जडेजाने 11 धावा केल्या. तर इतरांनी निराशा केली. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर बार्यडन कार्स आणि शोएब बशीर या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
इंग्लंडची बॅटिंग
त्यानंतर जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका देत टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. बुमराहने झॅक क्रॉलीला 4 धावांवर रस्ता दाखवला. त्यानंतर टीम इंडियाला आणखी काही विकेट्स मिळाल्या असत्या. मात्र बुमराहला फिल्डर्सकडून चांगली साथ मिळाली नाही. रवींद्र जडेजा याच्यासारख्या पट्टीच्या खेळाडूने कॅच सोडला. जडेजाने बेन डकेट याचा तर यशस्वी जयस्वाल याने ओली पोपचा कॅच सोडला. भारताने यासह झटपट विकेट्स मिळण्याची संधी गमावली.
डकेट आणि ओली पोप या दोघांनी जीवनदानाचा फायदा घेतला आणि इंग्लंडला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. मात्र बुमराहनेच ही जोडी फोडली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 122 धावा जोडल्या. त्यानंतर बुमराहने डकेटला 62 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर ओली पोप आणि जो रुट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान ओली पोप याने कसोटीत सलग दुसरं तर एकूण नववं शतक ठोकलं. मात्र त्यानंतर बुमराहने दुसऱ्याच बॉलवर भारताला तिसरी आणि सर्वात मोठी विकेट मिळवून दिली. बुमराहने जो रुट याला 28 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर ओली पोप याची साथ देण्यासाठी हॅरी ब्रूक मैदानात आला. टीम इंडियाकडून दुसऱ्या दिवसातील आणि इंग्लंडच्या डावातील शेवटची ओव्हरही बुमराहनेच टाकली. बुमराहने चौथ्या बॉलवर हॅरी ब्रूकला आऊट केलं. मोहम्मद सिराजने उलट्या दिशेने धावत जात अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे टीम इंडियाला दिवसाच्या शेवटची चौथी विकेट मिळाली. मात्र बुमराहचं नशिब फुटकं निघालं. बुमराहने टाकलेला बॉल नेमका नो बॉल निघाला. त्यामुळे ब्रूक वाचला. भारताला दिवसाचा शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र नो बॉलमुळे तसं होऊ शकलं नाही.
दुसरा दिवस इंग्लंडच्या नावावर
Stumps on Day 2 in Headingley!
England move to 209/3, trail by 262 runs.
3⃣ wickets so far for Jasprit Bumrah ⚡️
Join us tomorrow for Day 3 action 🏏
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/OcNi0x7KVW
— BCCI (@BCCI) June 21, 2025
इंग्लंडने अशाप्रकारे 209 रन्स केल्या. ओली पोप 131 बॉलमध्ये 100 रन्सवर नॉट आऊट आहे. तर हॅरी ब्रूक झिरोवर नाबाद आहे. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी बुमराहला चांगली साथ द्यावी आणि त्यांनी जसं आपल्याला गुंडाळलं तसंच गुंडाळून मोठी आघाडी घ्यावी, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे. आता यात भारतीय गोलंदाज किती यशस्वी होतात? हे तिसऱ्याच दिवशी स्पष्ट होईल.
