ENG vs IND : रवींद्र जडेजाची झुंज अपयशी, इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये 22 धावांनी विजय
England vs India 3rd Test Match Result : बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे लॉर्ड्समध्ये विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताला त्यात अपयश आलं.

इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी 14 जुलैला टीम इंडियावर 22 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने यासह या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. केएल राहुल याच्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडसमोर संघर्ष केला. अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तिघांनीही रवींद्र जडेजाला चांगली साथ दिली. मात्र टीम इंडिया विजयी धावांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात 74.5 ओव्हरमध्ये 170 धावांवर ऑलआऊट केलं आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
पहिला डाव बरोबरीत
इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या डावात जो रुट याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑलआऊट 387 रन्स केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही केएल राहुलच्या शंभरच्या मदतीने इंग्लंड इतक्याच 387 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 1 ओव्हरमध्ये 2 धावा केल्या. इंग्लंडच्या सलामी जोडीने वेळकाढूपणा केल्याने या शेवटच्या ओव्हरमध्ये फुल राडा पाहायला मिळाला. कर्णधार शुबमन गिल आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामी जोडीला चांगलंच सुनावलं. त्यामुळे चौथ्या दिवशी काय होतं? याची प्रतिक्षा चाहत्यांना होती.
चौथ्या दिवसाचा खेळ
भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने इंग्लंडला पहिले 2 झटके दिले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप या दोघांनी 1-1 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदर याने नावाप्रमाणे सुंदर कामगिरी करत इंग्लंडच्या चौघांना तंबूत पाठवलं. तर जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. भारताने अशाप्रकारे इंग्लंडला 192 धावांवर रोखलं.
टीम इंडियाचा दुसरा डाव
इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला 4 झटके दिले. यशस्वी जैस्वाल याला भोपळाही फोडता आला नाही. करुण नायर या डावातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. करुण 14 धावांवर बाद झाला. कर्णधार शुबमन गिल 6 रन्सवर एलबीडब्ल्यू झाला. तर नाईट वॉचमॅन आकाश दीप याच्या रुपात भारताने चौथ्या दिवशी चौथी आणि शेवटची विकेट गमावली.
टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत अशाप्रकारे 4 आऊट 58 रन्स केल्या. त्यामुळे भारताला पाचव्या दिवशी 135 धावांची गरज होती. तर इंग्लंड 6 विकेट्सने दूर होती. त्यामुळे पाचव्या दिवशी कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती.
पाचव्या दिवशी काय झालं?
पाचव्या दिवशी केएल राहुलसह उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात आला. या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र पहिला 1 तास भारतासाठी आव्हानात्मक होता. त्यामुळे पंत आणि केएलसमोर सांभाळून खेळण्याचं आव्हान होतं. मात्र ज्याची भीती तेच झालं. जोफ्रा आर्चर याने पंतला 9 धावांवर बोल्ड करत पाचवा झटका दिला.
त्यानंतर टीम इंडियाला आणखी मोठा झटका लागला. केएल राहुल 39 धावा करुन एलबीडब्ल्यू झाला. वॉशिंग्टन सुंदर याला भोपळाही फोडता आला नाही. सुंदर आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 7 आऊट 82 असा झाला. एका बाजूला टीम इंडिया विकेट गमावत होती. तर रवींद्र जडेजा दुसरी बाजू लावून होता. भारताने 7 विकेट्स गमावल्याने पुढील काही षटकातंच इंग्लंड जिंकेल असं वाटतं होतं. मात्र नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तिघांनी जडेजाला साथ देत इंग्लंडला विजयासाठी संघर्ष करायला लावला.
नितीश आणि जडेजा या दोघांनी आठव्या विकेटसाठी 92 बॉलमध्ये 30 रन्सची पार्टनरशीप केली. नितीश 53 चेंडूत 13 धावा करुन मैदानाबाहेर गेला. भारताने आठवी विकेट गमावली. मात्र जडेजा मैदानात असल्याने भारताला आशा होती.
जडेजाची साथ देण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानात आला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी इंग्लंडला चांगलंच झुंजवलं. या दोघांनी नवव्या विकेटच्या पार्टनरशीपमध्ये 133 बॉलचा सामना केला. अखेर ही जोडी फुटली. बुमराह मोठा फटका मारण्याच्या मोहात कॅच आऊट झाला. बुमराहने फक्त 5 धावा केल्या. मात्र बुमराहची साथ महत्त्वाची ठरली. बुमराहने 54 चेंडूंचा सामना केला. त्यामुळ टीम इंडिया सामन्यात कायम होती.
बुमराह आऊट झाल्यानंतर मोहम्मद सिराज आला. जडेजाने या दरम्यान सलग चौथं अर्धशतक ठोकलं. तर दुसऱ्या बाजूने सिराजही जडेजाला चांगली साथ दिली. आता भारताला 22 धावांचीच गरज होती. एका बाजूला जडेजा चिवटपणे खेळत होता. तर सिराजही सावधपणे खेळत होता. मात्र शोएब बशीर याने 75 व्या ओव्हरमधील टाकलेल्या पाचव्या बॉलवर टीम इंडियाचा डाव आटोपला. सिराजने बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. यात पाहता पाहता बॉल जाऊन स्टंपला लागला. यासह टीम इंडिया ऑलआऊट झाली. इंग्लंडने अशाप्रकारे सामना 22 धावांनी जिंकला.
सिराज 4 धावांवर बाद झाला. तर रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. जडेजाने 181 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 61 धावा केल्या. इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्स या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. ब्रायडन कार्स याने दोघांना बाद केलं. तर ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
