Hardik Pandya : हार्दिक पंड्या मोठ्या विक्रमासाठी सज्ज, मुल्लानपूरमध्ये ऑलराउंडर इतिहास घडवणार!
Hardik Pandya India vs South Africa: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला दुसऱ्या टी 20i सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने दुखापतीनंतर दणक्यात कमबॅक केलं. हार्दिकने 9 डिसेंबरला दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यातून पुनरागमन केलं. हार्दिकने या पहिल्याच सामन्यात चाबूक कामगिरी केली. हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिंगने दमदार कामगिरी करत तो मॅचविनर ऑलराउंडर का आहे? हे पुन्हा सिद्ध करुन दाखवलं. हार्दिकने पहिल्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत असताना अर्धशतक झळकावलं. हार्दिकने नाबाद 59 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने 1 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला 74 धावांवर गुंडाळण्यात इतर गोलंदाजांना मदत केली. हार्दिकला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता हार्दिकला दुसऱ्या टी 20I सामन्यात ऐतिहासिक अशी कामगिरी करण्याची संधी आहे.
दुसरा टी 20I सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20I सामना हा 12 डिसेंबरला न्यू चंडीगढमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर इथे होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर हार्दिक या सामन्यात ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हार्दिकला फक्त 1 विकेटची गरज
आतापर्यंत टी 20I क्रिकेटच्या इतिहासात कुणालाच जमलं नाही ते हार्दिकला करुन दाखवण्याची संधी आहे. याआधी एकूण 3-4 ऑलराउंडर्सनी टी 20I क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केलीय. मात्र ते फिरकीपटू आहेत. तर हार्दिक वेगवान गोलंदाज आहे. त्यासाठी हार्दिकला फक्त 1 विकेटची गरज आहे.
100 विकेट्स आणि 100 षटकार
हार्दिक पंड्या याने आतापर्यंत टी 20I क्रिकेटमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकला टी 20 क्रिकेटमध्ये विकेट्सचं शतक करण्यासाठी फक्त 1 विकेट हवी आहे. हार्दिक असं करताच टी 20I फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा आणि 100 षटकार लगावणारा टीम इंडियाचा आणि एकूणच पहिलाच वेगवान गोलंदाज असलेला ऑलराउंडर ठरेल. हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या टी 20I सामन्यात षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं होतं. हार्दिकने अशाप्रकारे 100 टी 20I सिक्स पूर्ण केले होते.
तसेच हार्दिकआधी झिंबाब्वे, अफगाणिस्तान आणि मलेशिया क्रिकेट टीमच्या प्रत्येकी 1-1 खेळाडूने टी 20I क्रिकेटमध्ये 100 विकेट्स आणि 100 षटकार झळकावले आहेत. आतापर्यंत सिकंदर रजा, मोहम्मद नबी आणि विरनजीर सिंह या 3 स्पिन ऑलराउंडर्सने टी 20I क्रिकेटमध्ये 100 सिक्स आणि तितकेच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
