IND vs SA : हार्दिक पंड्या याचं स्फोटक अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?
India vs South Africa 1st T20i 1st Innings Highlights : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला ठराविक अंतराने झटके दिले. मात्र हार्दिक पंड्या याने संकटमोचकाची भूमिका बजावत भारताला 175 धावांपर्यंत पोहचवलं.

ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर कटकमधील पहिल्या टी 20i सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिकचा अपवाद वगळता तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र टॉप ऑर्डरमधील तिन्ही फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना बचाव करण्यासाठी कमी धावा मिळाल्या. आता भारतीय गोलंदाज या मैदानात कशी बॉलिंग करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. उपकर्णधार शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र शुबमन डावातील तिसऱ्याच बॉलवर आऊट झाला. शुबमनने 4 धावा करुन मैदानाबाहेर गेला. शुबमननंतर कॅप्टन सूर्यकुमार अभिषेकला साथ देण्यासाठी मैदानात आला.
टॉप ऑर्डरकडून निराशा
सूर्याला अपेक्षित सुरुवात मिळाली. सूर्याने 1 सिक्स आणि 1 फोरसह दुहेरी आकडा गाठला. मात्र सूर्याने निराशा केली. सूर्या 12 रन्सवर आऊट झाला. अभिषेक शर्मा यानेही संयमी सुरुवात केली होती. मात्र अभिषेकही अपयशी ठरला. अभिषेकने 12 बॉलमध्ये 17 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
मधल्या फळीने डाव सावरला
अभिषेक आऊट झाल्यानंतर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि जितेश शर्मा या 5 फलंदाजांनी टीम इंडियाला सावरलं. अक्षर आणि तिलक या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये 30 रन्सची पार्टनरशीप केली. तिलक वर्मा 26 रन्स करुन आऊट झाला.
हार्दिकचं चाबूक अर्धशतक
तिलकनंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. हार्दिक आणि अक्षरने पाचव्या विकेटसाठी 26 रन्स जोडल्या. अक्षर 23 धावा करुन आऊट झाला. अक्षरनंतर शिवम दुबे मैदानात आला. हार्दिक आणि शिवमने 19 बॉलमध्ये फटकेबाजी करत सहाव्या विकेटसाठी 33 रन्सची पार्टनरशीप केली. शिवमला फटकेबाजी करण्याची संधी होती. मात्र शिवमने निराशा केली. शिवमने 11 धावा केल्या.
त्यानंतर हार्दिक आणि जितेश शर्मा या जोडीने सातव्या विकेटसाठी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 38 रन्सची पार्टनरशीप केली.जितेशने नाबाद 10 धावा केल्या. तर हार्दिकने 28 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह 59 रन्स केल्या
