IPL 2022: जे रोहीत- विराटला नाही जमलं, ते हार्दिक पंड्यानं कसं केलं? गुजरात टायटन्स ‘स्टार्टअप’चे 7 फॅक्टर

IPL 2022: जे रोहीत- विराटला नाही जमलं, ते हार्दिक पंड्यानं कसं केलं? गुजरात टायटन्स 'स्टार्टअप'चे 7 फॅक्टर

IPL 2022: मुंबई आणि चेन्नईवर अशी वेळ ओढवेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स इतकी धडाकेबाज कामगिरी करतील, याची कोणालाही अपेक्षा नव्हती. पण हे आजचं वास्तव आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 25, 2022 | 5:54 PM

मुंबई: IPL 2022 चा सीजन क्रिकेटच्या जाणकारांसाठी अनेक अर्थांनी अनपेक्षित असा आहे. कारण या सीजनमधले निकाल, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे लीगमधले दोन मोठे संघ. क्रिकेट चाहत्यांना या दोन टीम्सकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण आज या दोन टीम्स तळाला आहेत. मुंबई आणि चेन्नईवर अशी वेळ ओढवेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स इतकी धडाकेबाज कामगिरी करतील, याची कोणालाही अपेक्षा नव्हती. पण हे आजचं वास्तव आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) फायनलमध्ये पोहोचलीय, तर लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ प्लेऑफमध्ये आहे. काल क्वालिफायर 1 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर वुद्धिमान साहाचा विकेट गेला, तेव्हा गुजरातच्या संघाच आज काही खरं नाही, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. पण शेवटी सामन्याचा जो निकाल लागला, तो पूर्णपणे वेगळा होता. गुजरातच्या संघाने विशाल लक्ष्याचा पाठलाग करुन फायनलमध्ये धडक मारली. गुजरातच्या टीमचं असं काय वैशिष्ट्य आहे? त्यांना इतकी जबरदस्त कामगिरी करणं, कशामुळे शक्य झालं? ते समजून घेऊया.

संतुलित संघ 

1 – संतुलित संघ हे गुजरात टायटन्सच्या यशाचं पहिलं कारण आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातची टीम संतुलित आहे. या संघाकडे चांगले फलंदाजही आहेत आणि चांगले गोलंदाज सुद्धा. पहिल्या दोन-तीन विकेट गेल्यानंतरही गुजरातकडे सातव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. महत्त्वाचं म्हणजे गुजरातची टीम शेवटपर्यंत सामना सोडत नाही. अखेरपर्यंत त्यांचा विजयासाठी संघर्ष सुरु असतो.

 

मॅचविनर कॅप्टन 

2 – कॅप्टन हार्दिक पंड्या हे गुजरातच्या यशाच एक मुख्य कारण आहे. भारतीय संघातून खेळणारा हार्दिक पंड्या आणि गुजरात टायटन्सकडून खेळणारा पंड्या यात फरक दिसून आलाय. कॅप्टन झाल्यानंतर हार्दिक पंड्या जास्त जबाबदार झालाय. आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये हार्दिक पंड्याने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. सामना रोमांचक वळणार असताना, मॅच फिनिशिंगसाठी त्याची धडपड दिसलीय. कॅप्टन म्हणून हार्दिकने टीम समोर एक चांगल उद्हारण सादर केलय. जो स्वत: प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. हार्दिकने आयपीएलच्या 14 इनिंगमध्ये 453 धावा केल्या आहेत. यात चार हाफ सेंच्युरी आहेत.

फिनिशर तेवतिया

3 – राहुल तेवतिया गुजरातच्या यशाचं दुसरं कारण आहे. राहुल तेवतियाने गुजरात टायटन्ससाठी फिनिशरची भूमिका चोख वठवली आहे. 30 चेंडूत 50-60 धावांची गरज असेल आणि राहुल क्रीझवर असेल, तर हमखास विजयाची खात्री देता येते. या सीजनमध्ये राहुल तेवतियाचा परफॉर्मन्सचा तसा आहे. राहुल तेवतियाने अनेक सामन्यात शेवटपर्यंत खेळपट्टिवर टिकून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिलाय. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दोन चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. राहुलने ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकून विजय मिळवून दिला. अटी-तटीच्या सामन्यांमध्ये त्याने महत्त्वाचा रोल निभावलाय. त्यामुळे तो गुजरातच्या यशाचं दुसरं कारण आहे. राहुल तेवतियाने या सीजनमध्ये 15 सामन्यात 217 धावा फटकावल्या आहेत. यात 43 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

किलर मिलर

4 – डेविड मिलरने या सीजनमध्ये गुजरात टायटन्ससाठी किलर परफॉर्मन्स दिलाय. अटी-तटीच्या सामन्यांमध्ये मिलरची बॅट तळपली आहे. काल क्वालिफायर 1 च्या सामन्यामध्ये मिलरमुळे आयपीएलच्या पहिल्या फायनलमध्ये पोहोचण्याचा गुजरातच स्वप्न साकार झालं. शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना, त्याने सलग तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. या सीजनमध्ये गुजरातसाठी त्याने अनेक सामन्यात अशी कामगिरी केली. तेवतिया-मिलरची जोडी अनेक सामन्यात गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली आहे. अपवाद फक्त मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा. शेवच्या ओव्हरमध्ये मिलर क्रीझवर असतानाही 9 धावा होऊ शकल्या नव्हत्या. डेविड मिलरने या सीजनमध्ये 15 सामन्यात 449 धावा फटकावल्या आहेत. यात दोन अर्धशतक आहेत. महत्त्वाचं म्हणजे ऑक्शनमध्ये या मिलरला कोणी विकतही घेत नव्हतं.

राशिद खान

5 – राशिद खान या सीजनमध्ये गुजरात टायटन्ससाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतोय. गोलंदाजी बरोबर फलंदाजीतही तो चमक दाखवतोय. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात 22 धावांची गरज होती. त्यावेळी मार्को जॅनसेनच्या षटकात शेवटच्या दोन चेंडूवर षटकार ठोकून त्याने विजय मिळवून दिला. त्यामुळे गोलंदाजीने शक्य होत नाही, तेव्हा राशिद खान बॅटने योगदान देतो. राशिदने या सीजनमध्ये 15 सामन्यात 18 विकेट घेतल्यात. 91 धावा केल्या आहेत.

विकेटटेकर शमी

6 – मोहम्मद शमी ओपनिंग बॉलर म्हणून आपलं काम चोख बजावतोय. पावरप्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त विकेट मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना त्याचा स्विंग प्रभावी ठरतोय. डेथ ओव्हर्समध्येही शमी सहजासहजी धावा देत नाही. सुरुवातीलाच दोन-तीन विकेट काढून प्रतिस्पर्धी संघाला तो दबावामध्ये आणतो. शमीने या सीजनमध्ये 15 सामन्यात 19 विकेट काढल्यात.

Gujarat Titans Asish Nehra

मास्टरमाइंड नेहरा 

7 – आशिष नेहरा हे गुजरातच्या विजयाचं आणखी एक कारण आहे. हेड कोच म्हणून आशिष नेहराने आखलेली रणनिती या सीजनमध्ये प्रभावी ठरली आहे. ज्या खेळाडूंवर कुठल्याही फ्रेंचायजीने पूर्ण विश्वास ठेवला नव्हता, अशा खेळाडूंना आशिष नेहराने आपल्या प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. नेहराने राहुल तेवतियाला फिनिशरचा रोल दिला. ऑलराऊंडर असलेल्या तेवतियाला नेहराने फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. यश दयाल आपला पहिला सीजन खेळतोय. नेहराने ओपनिंग गोलंदाजीची जबाबदारी दिली. खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करणं, हे आशिष नेहराचं वैशिष्ट्य आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें