IND vs AUS: तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या मनातलं आलं बाहेर, म्हणाला..
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक असून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. असं असताना सूर्यकुमार यादवने आपल्या मनातलं सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतान 18.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. कारण मागच्या काही सामन्यात सूर्यकुमार यादव नाणेफेकीचा कौल गमावत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि मनासारखा निर्णय घेता आला. याबाबत सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘मला वाटतं आम्ही सलग 19 ते 20 नाणेफेकीचे कौल गमावले होते. ही मालिका मोडणे खूप छान होते. आज नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते आणि संघाने केलेल्या कामगिरीबद्दल मी खरोखर आनंदी आहे.’
भारताच्या विजयाचा शिल्पकार वॉशिंग्टन सुंदर ठरला. तर सामनावीराचा पुरस्कार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग घेऊन गेला. तिसऱ्या टी20 सामन्यात बदल करत या दोघांना जितेश शर्मासह संघात स्थान दिलं होतं. या बदलाबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ते खेळाडू खूप कठोर सराव करत होते आणि त्यांच्या संधीची वाट पाहत होते. वॉशिंग्टन सुंदरने खूप लवचिकता दाखवली, जितेशने चांगले योगदान दिले आणि अर्शदीप उत्कृष्ट होता.’
बुमराह आणि अर्शदीप जोडीबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘बुमराह शांतपणे त्याचे काम करतो. त्यावर कायम राहतो आणि अर्शदीप दुसऱ्या टोकापासून फायदा घेतो. एकत्रितपणे ती खरोखरच एक घातक जोडी आहे. ही मालिका 1-1ने सेट केली आहे. आम्ही एका नवीन ठिकाणी जात आहोत. त्यामुळे हे एक नवीन आव्हान असेल. परंतु मुले आत्मविश्वासाने आणि त्यांच्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत.’ दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने सांगितलं की, आम्हाला कदाचित 20 धावा कमी पडल्या असतील. याचं श्रेय भारताला जातं. कारण त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्ही मैदानात आमचे सर्वोत्तम दिले, पण ते विजयाच्या पात्रतेचे होते.
आक्रमक खेळीबाबत मिचेल मार्श म्हणाला की, ‘आम्हाला फक्त त्या अतिरिक्त 20 धावा हव्या होत्या. मला आमच्या फलंदाजांचा हेतू आवडला. विशेषतः टिम डेव्हिड, जो सुरुवातीच्या विकेटनंतर आला आणि उत्कृष्ट खेळला. स्टोयनिसनेही शेवटी उत्तम अनुभव दाखवला.’
