IND vs ENG : टीम इंडियाचे 3 खेळाडू एकदिवसीय पदार्पणाच्या प्रतिक्षेत, कॅप्टन रोहित कुणाला देणार संधी?
India vs England Odi Series 2025 : टीम इंडियात एकसेएक आणि तोडीसतोड खेळाडू आहेत. टीममध्ये निवड झाल्यानंतर कुणाला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी द्यायची आणि कुणाला नाही? हा प्रश्न कायमच भेडसावत असतो.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या काही खेळाडूंचं नशीब फळफळू शकतं. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात असे 3 खेळाडू आहेत ज्यांनी वनडे डेब्यू केलेलं नाही. त्यामुळे हे तिघेही एकदिवसीय पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र एकाचंच ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सलामीच्या सामन्यातच कोणत्याही एका खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते. मात्र या तिघांपैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ते तिघे कोण आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी हे तिघे वनडे डेब्यूच्या प्रतिक्षेत आहेत. यशस्वी कॅप्टन रोहित शर्मासोबत कसोटीत सलामी करतो. तसेच दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. हर्षित राणा हा हेड कोच गौतम गंभीर याच्या जवळचा आहे. हर्षितने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यादरम्यान पदार्पण केलं आणि सामना फिरवला.
हर्षितने कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून खेळताना 3 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर वरुण चक्रवर्थी याची एकदिवसीय मालिकेसाठी निवडही करण्यात आली नव्हती. मात्र वरुणने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणला त्याच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ या पुरस्कारने गौरवण्यात आलं. त्यानंतर वरुणची 4 फेब्रुवारीला एकदिवसीय संघात एन्ट्री झाली. त्यामुळे या तिघांमध्ये पदार्पणासाठी जोरदार स्पर्धा आहे, मात्र यशस्वीची शक्यता फार कमी आहे.
शुबमन गिल हा या मालिकेत टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल हो दोघे ओपनिंग करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे कदाचित संपूर्ण मालिकेत यशस्वीला बेंचवरच बसावं लागू शकतं.
तसेच संघात अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी हे दोघे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे हर्षित राणा यालाही प्रतिक्षा करावी लागू शकते. मात्र कुलदीप यादव हा पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे वरुणला पदार्पणाची संधी मिळू शकते.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा