IND vs NZ : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, न्यूझीलंडसाठी करो या मरो स्थिती, गुवाहाटीत कोण जिंकणार?
India vs New Zealand 3rd T20i Preview : टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध नववर्षातील पहिलीच टी 20i मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत चांगल्या स्थतितीत आहे.

टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात नागपूर आणि त्यानंतर रायपूरमध्ये विजय मिळवून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्या स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेली न्यूझीलंड टीम तिसऱ्या सामन्यात पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. अशात चाहत्यांना तिसऱ्या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा रविवारी 25 जानेवारीला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करणार की न्यूझीलंड पलटवार करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारताची गुवाहाटीतील कामगिरी
टीम इंडियाची गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे. भारताने या मैदानात एकूण 4 टी 20i सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. इतर 2 सामन्यांत भारताला प्रतिस्पर्धी संघांकडून पराभूत व्हावं लागंलय. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत जरी आघाडीवर असली तर त्यांच्यासमोर गुवाहाटीतील या मैदानात आपली आकडेवारी सुधारण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानात भारताला दोन्ही सामन्यांत पराभूत केलंय. तर भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केलीय. तर या मैदानात श्रीलंकेविरुद्धचा सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
संजू-अभिषेककडे लक्ष
दरम्यान अभिषेक शर्मा याने पहिल्या सामन्या स्फोटक बॅटिंग केली होती. मात्र अभिषेक दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. तर संजू सॅमसन गेल्या सलग 2 सामन्यांपासून अपयशी ठरत आहे.
