IND vs SA : दक्षिण आफ्रिकेकडे तिसऱ्या दिवसापर्यंत 314 धावांची आघाडी, टीम इंडिया सलग दुसऱ्या पराभवाच्या दिशेने!
India vs South Africa 2nd Test Day 3 Highlights : सेनुरन मुथुसामी याच्या शतकी खेळीनंतर मार्को यान्सेन याने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया विरुद्ध 288 धावांची आघाडी मिळाली.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने यासह सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये सेनुरन मुथुसामी याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 489 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 9 धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून तिसऱ्या दिवशी जोरदार फाईटची अपेक्षा होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 201 धावांवर गुंडाळलं. मार्को यान्सेन याने 6 विकेट घेतल्या.
टीम इंडिया फॉलोऑन टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या धावाही पूर्ण करण्यात अपयशी ठरली. त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन दिला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 26 धावा केल्या. रायन रिकेल्टन 13 आणि एडन मार्रक्रम याने नाबाद 12 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाचा खेळ
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 9 धावांपासून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. केएल आणि यशस्वी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. केएलच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. केएने 22 धावा केल्या.
टीम इंडियाची घसरगुंडी
त्यानंतर यशस्वीने साई सुदर्शन याच्यासह काही धावा जोडल्या. यशस्वीने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. मात्र यशस्वीला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वीने 97 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. इथून भारताची घसरगुंडी झाली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 27 धावांच्या मोबदल्यात 7 झटके दिले. यशस्वी 58, साई सुदर्शन 15, ध्रुव जुरेल 0, कॅप्टन ऋषभ पंत 7, नितीश कुमार रेड्डी 10 आणि रवींद्र जडेजा 6 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे भारताची 7 आऊट 122 अशी झाली.
आठव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी
भारताच्या घसरगुंडीनंतर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने लाज राखली. या जोडीने आठव्या विकेटसाठी 208 बॉलमध्ये 72 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे भारताला 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या. मात्र वॉशिंग्टन आऊट होताच ही जोडी फुटली. सुंदरने 92 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 48 रन्स केल्या. त्यानंतर कुलदीप यादव आऊट झाला. कुलदीप पहिल्या डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला. कुलदीपने 134 बॉलमध्ये 19 रन्स केल्या. तसेच जसप्रीत बुमराह 5 धावांवर आऊट होताच भारताचा डाव आटोपला.
दक्षिण आफ्रिकेसाठी मार्का यान्सेन याने 6 विकेट्स मिळवल्या. मार्कोची कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही चौथी तर टीम इंडिया विरुद्धची पहिली वेळ ठरली. सायमन हार्मर याने तिघांना आऊट केलं. तर केशव महाराज याने 1 विकेट मिळवली.
दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची आघाडी
दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावातील 288 धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात पाहुण्या संघाच्या सलामी जोडीने नाबाद 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह एकूण 314 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
