IND vs SA : हिटमॅन-यशस्वी ओपनर! श्रेयसच्या जागी कोण खेळणार? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन
India vs South Africa Odi Series 2025 : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल हे दोघे दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी पुन्हा एकदा वनडे सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित आणि विराट दोघेही अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत खेळले होते. भारताचा या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने चाबूक भागीदारी करत भारताला विजयी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत.
तसेच या मालिकेत टीम इंडियाचा युवा आणि स्टार ओपनर यशस्वी जैस्वाल हा देखील खेळताना दिसणार आहे. यशस्वी या मालिकेत ओपनिंग करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच दुखापतीमुळे भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल याला वनडे सीरिजला मुकावं लागलं आहे. त्यामुळे यशस्वी आणि रोहित हे दोघेही ओपनिंग करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र श्रेयस अय्यर याच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. श्रेयसला या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली नाही.
एका जागेसाठी चौघांमध्ये चुरस
यशस्वी फक्त एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे. मात्र यशस्वीला ओपनिंगचा अनुभव आहे. तर रोहित ओपनर म्हणूनच खेळतोय. मात्र श्रेयसच्या चौथ्या स्थानी कोण खेळणार हा प्रश्न आहे. श्रेयसच्या जागेसाठी 3 दावेदार आहेत. या तिघांमध्ये ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत आणि तिलक वर्मा या तिघांमध्ये चुरस असणार आहे.
ऋतुराजचा बॅकअप ओपनर म्हणून समावेश करण्यात आला आहे.मात्र ऋतुराजने दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध केलेली कामगिरी पाहता त्याला चौथ्या स्थानी पाठवल्यास आश्चर्य वाटणार नाही. तसेच ऋषभ पंत आणि तिलक वर्मा यांच्यातही चढाओढ असणार आहे.
ऋषभवर या मालिकेत बॅटिंग आणि विकेटकीपिंगची दुहेरी जबाबदारी असणार आहे. ऋषभने कीपिंग केल्यास केएलवरचा अतिरिक्त ताण कमी होईल. मात्र ऋषभने अखरचा एकदिवसीय सामना हा ऑगस्ट 2024 साली खेळला होता. तसेच ऋषभला एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे आता तिलकला श्रेयसच्या जाग संधी मिळणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र टीम मॅनेजमेंट याबाबत काय निर्णय घेते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्पिन, ऑलराउंडर आणि वेगवान गोलंदाज
तसेच रवींद्र जडेजा याचं एकदिवसीय संघात कमबॅक झालंय. जडेजाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आली नव्हती. जडेजा वॉशिंग्टन सुंदरसह खेळू शकतो. या दोघांवर बॉलिंग आणि बॅटिंग अशी दुहेरी जबाबदारी असेल. कुलदीप यादव प्रमुख फिरकीपटू असेल. तर अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या तिघांवर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा.
