IPL 2025 FINAL : टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी की बॉलिंग? नरेंद्र मोदी स्टेडियममधील आकडेवारी कुणाच्या बाजूने?
RCB vs PBKS Record in Narendra Modi Stadium : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज आहेत. मात्र दोन्ही संघांपैकी फक्त एकच संघ विजेता होईल. या दोन्ही संघांची नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

आयपीएल 2025 ट्रॉफीचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेक वर्षांनंतर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात नवा विजेता मिळणार आहे. अंतिम सामन्यात 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. पंजाबची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी तर आरसीबची चौथी वेळ आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांना अंतिम फेरीत विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांची 18 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची प्रतिक्षा कायम आहे. मात्र त्या 2 पैकी एका संघाची प्रतिक्षा संपणार आहे. तर एका संघाला आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता कोण जिंकणार आणि कोण हरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. या निमित्ताने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉस जिंकून काय निर्णय घ्यावा? हे आपण आकडेवारीच्या मदतीने जाणून घेऊयात.
एकूण 43 सामने
आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतील 43 सामने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 21 वेळा टॉस जिंकून बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर टॉस जिंकून फिल्डिंग करणारी टीम 22 वेळा यशस्वी झाली आहे. तसेच आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतपर्यंत 8 पैकी 6 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकलीय. तर 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ यशस्वी ठरला आहे.
अहमदाबादमध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने गुजरात विरुद्ध याच 18 व्या मोसमात 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. तर निच्चांकी धावसंख्येचा विक्रम गुजरात टायटन्सच्या नावावर आहे. गुजरातने दिल्ली विरुद्ध 89 रन्स केल्यात. या मैदानात सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याच्या नावावर आहे. गिलने 2023 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध 129 रन्स केल्या आहेत.
पंजाब आणि आरसीबीची कामगिरी
पंजाब किंग्सने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. पंजाबने त्यापैकी 4 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच 1 सामना हा टाय झाला. तर दुसर्या बाजूला आरसीबीने 6 सामने खेळले आहेत. आरसीबीला 6 पैकी 3 वेळा विजय मिळवता आला आहे. तर 3 वेळा आरसीबीला पराभूत व्हावं लागलं.
पावसाचा अंदाज काय?
पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान पाऊस होण्याची 62 टक्के शक्यता आहे. पाऊस झाला तर चाहत्यांचं हिरमोड होऊ शकतं. तसेच पावसामुळे खेळ वाया गेल्यास अंतिम सामन्यासाठी 1 राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
