MI vs DC : मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिट्ल्स निर्णायक सामन्यातून कॅप्टन आऊट, टीमला झटका
Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला कर्णधाराला मुकावं लागलं आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना फार महत्त्वाचा आहे. दिल्लीसाठी हा सामना करो या मरो असा आहे. या अशा स्थितीत दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा झटका लागला आहे. दिल्लीचा कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर अक्षर पटेल या सामन्यातून बाहेर झाला आहे. अक्षर आजारी असल्याने त्याला या सामन्याला मुकावं लागलं आहे. फाफ डु प्लेसीस याने याबाबतची टॉस दरम्यान माहिती दिली. अक्षरच्या अनुपस्थितीत आता फाफ डु प्लेसीस दिल्लीचं नेतृत्व करणार आहे.
फाफ डु प्लेसीस काय म्हणाला?
या सामन्यात खेळता न येणं हे अक्षरसाठी दुर्दैवी आहे.गेल्या दोन दिवसांपासून तो खूप आजारी आहे. अक्षर लवकरात लवकर बरा व्हावा. अक्षरने या मोसमात सर्वोत्तम कामगिरी केलीय. त्यामुळे या सामन्यात आम्हाला अक्षरची उणीव नक्कीच भासेल. एकटा अक्षर 2 खेळाडूंप्रमाणे आहे. अक्षर एक उत्तम फिरकी गोलंदाज आणि एक उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे अक्षरची जागा घेणं कठीण आहे. आमच्याकडे अक्षरच्या तोडीचा खेळाडू नाहीय. असं फाफ डु प्लेसीस याने टॉसदरम्यान म्हटलं. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. मिचेल सँटनर याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे कॉर्बिन बॉश याला बाहेर करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती कर्णधार हार्दिक पंड्या याने दिली.
दिल्लीसाठी करो या मरो सामना
दिल्लीसाठी मुंबई विरुद्धचा हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने करो या मरो असा आहे. दिल्लीचा हा 13 वा सामना आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी या सामन्यासह पंजाब विरुद्धही जिंकावं लागणार आहे. दिल्लीने याआधी खेळलेल्या 12 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये 13 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबईने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबई 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईकडे दिल्ली विरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे दिल्लीसमोर मुंबईला या सामन्यात पराभूत करुन प्लेऑफमध्ये कायम राहण्याचं आव्हान आहे. दिल्ली यात किती यशस्वी ठरते? हे सामन्यानंतर स्पष्ट होईल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह