IPL 2025 : लखनौ विरुद्धचा सामना कोलकाता नाईट रायडर्सने कुठे गमावला? कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला..
आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा निसटता पराभव झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 238 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना फक्त 4 धावा कमी पडल्या. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने काय चुकलं ते सांगितलं.

आयपीएल 2025 स्पर्धेतील 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर सहज धावांचा पाठलाग होईल असं त्याने त्यावेळी सांगितलं होतं. पण लखनौ सुपर जायंट्सने 238 धावांचं मोठं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. खरं तर हे आव्हान खूप कठीण होतं. पण एक क्षण कोलकाता आरामात हे आव्हान गाठेल असं वाटत होतं. पण शेवटी विजयी धावांचा पाठलाग करताना 4 धावा कमी पडल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना केकेआरने सात सामने 4 किंवा त्यापेक्षा कमी धावांनी गमावले आहेत. त्यापैकी तीन सामने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहेत.या पराभवानंतर अजिंक्य रहाणेनं पराभवाचं विश्लेषण केलं.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘खूपच कठीण सामना. मी नाणेफेकीच्या वेळी म्हटल्याप्रमाणे 40 षटकापर्यंत विकेट चांगली राहिली. आम्ही आमचे सर्वोत्तम दिले, हा एक उत्तम खेळ होता. शेवटी आम्हाला फक्त 4 धावा कमी पडल्या. जेव्हा तुम्ही 230 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्ही विकेट गमावण्याची शक्यता अधिक असते. फलंदाजीसाठी हा सर्वोत्तम विकेटपैकी एक होता. फलंदाजांना खेळण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागला. आमच्याकडे असलेल्या गोलंदाजीच्या आक्रमणामुळे आम्ही आमच्या मधल्या षटकांवर खरोखर चांगले नियंत्रण ठेवले. सुनील संघर्ष करत होता. सुनील आणि वरुण सहसा मधल्या षटकांवर वर्चस्व गाजवतात, परंतु आज गोलंदाजांसाठी ते कठीण होते.’
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, मला वाटतं जेव्हा आम्ही फलंदाजी केली तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं की खेळ इतका जवळ येईल. पण पॉवरप्लेनंतर आम्ही तेच केलं. पहिल्या टाइमआउटनंतर आम्ही गोलंदाजांकडे गेलो आणि त्यांना योजनांवर टिकून राहण्यास तसेच जास्त काही करू नका आणि मूलभूत गोष्टी योग्यरित्या करण्यास सांगितले. ते खूप जाणीवपूर्वक होते. जेव्हा खेळ त्या वेगाने सुरू असतो तेव्हा तुम्हाला काहीतरी करावे लागते. ते कधीकधी काम करते आणि कधीकधी ते काम करत नाही.’ दुसरीकडे, अब्दुल समदला चौथ्या क्रमांकावर बढती का दिली? यावर ऋषभ पंतने सांगितलं की, आम्हाला उजवं-डावं असं कॉम्बिनेशन हवं होतं.
