LSG vs CSK : लखनौ विरुद्धचा पराभव महागात, चेन्नईचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं! आता किती संधी?
IPL 2026 Points Table : लखनौ सुपर जायंट्सने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीत वाढ केली आहे. चेन्नईचा पराभवासह प्लेऑफचा मार्ग अवघड झाला आहे. जाणून घ्या.

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम (IPL 2026) अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर प्लेऑफसाठी जोरदार लढत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्पर्धेतून बाहेर झालेल्या 2 संघांनी 2 दिवसात प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या संघांना झटका दिला आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणीत वाढ केलीय. मुंबईने 14 मे रोजी पंजाब किंग्सला पराभूत केलं. पंजाबचा हा सलग आणि एकूण पाचवा पराभव ठरला. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने शुक्रवारी 15 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. अशाप्रकारे मुंबई आणि लखनौ या दोन्ही संघांनी प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या संघांच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे पंजाबनंतर चेन्नईचं प्लेऑफचं समीकरण फिस्कटलं आहे.
चेन्नईच्या अडचणीत वाढ, लखनौने टेन्शन वाढवलं
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करुन 19 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला. लखनौने या विजयासह चेन्नई विरूद्धच्या गेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. लखनौचा एकाना स्टेडियममधील हा 10 व्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. तर चेन्नईचं पराभवासह प्लेऑफचं गणित फिस्कटलं आहे. चेन्नईची पराभवानंतर प्लेऑफची शक्यता ही 28 टक्के इतकी राहिली आहे. या निमित्ताने चेन्नईचं प्लेऑफचं समीकरण कसं आहे? हे जाणून घेऊयात.
चेन्नईला पराभवानंतर फटका
चेन्नईला पराभवासह पॉइंट्स टेबलमध्येही नुकसान झालं आहे. चेन्नईचा हा या मोसमातील 12 सामन्यांनंतर सहावा पराभव ठरला. चेन्नईची यासह एका स्थानाने घसरण झाली. चेन्नई पाचव्या स्थानावरुन सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. चेन्नईला नेट रनरेटमध्येही फटका बसला आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा सामन्याआधी +0.185 असा होता तो पराभवानंतर +0.027 असा झाला आहे.
चेन्नईच्या अडचणीत वाढ
दरम्यान चेन्नईला या पराभवामुळे आता प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. चेन्नई समोर उर्वरित 2 सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे चेन्नईचा या सामन्यांत चांगलाच कस लागणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये 10 संघांची स्थिती
शनिवारी केकेआर-गुजरात आमनेसामने
दरम्यान शनिवारी 16 मे रोजी आयपीएल 2026 स्पर्धेतील 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना इडन गार्डन्समध्ये होणार आहे. गुजरातने हा सामना जिंकल्यास ते अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये पोहचतील.
