टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघ पोहोचणार! इरफान पठाणने वर्तवलं भाकीत
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जेतेपदासाठी प्रत्येक संघ तयारी करत आहे. असं असताना या जेतेपदासाठी काही संघ प्रबळ दावेदार मानले जात आहे. इरफान पठाणने तर उपांत्य फेरी गाठू शकतील अशा चार संघांची नावंही सांगून टाकली.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता एका आठवड्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून जेतेपदासाठी लढत सुरू होणार आहे. गतविजेता भारतीय संघ यावर्षी जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने भारत प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात आहे. भारताचा फॉर्म पाहता तसंच म्हणावं लागेल. पण ही वाट भारतासाठी वाटते तितकी सोपी नसेल. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. इरफान पठाणने स्टार स्पोर्टशी बोलताना टी20 वर्ल्डकप 206 स्पर्धेबाबत भाकीत वर्तवलं आहे. यात त्याने कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतील त्यांची नावं सांगितली आहेत. त्यात एका संघाचं नाव ऐकून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इरफान पठाणच्या मते भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारताने 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यापासून मागे वळून पाहिलं नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मालिका विजयाचा धडाका लावला आहे. त्यामुळे यंदाही भारताकडून जेतेपदाची अपेक्षा आहे. पण भारताने भारतात झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कधी जेतेपद मिळवलेलं नाही. पण यावेळी संघ वेगळ्याच फॉर्मात आहे. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फॉर्मात आहेत. तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती सामना फिरवण्याची ताकद ठेवतात.
दुसरीकडे, आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला कमी लेखनं चुकीचं ठरेल. कारण या संघाने कायम आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड संघातही जेतेपदाची धमक आहे. त्यामुळे इंग्लंडही जेतेपदाच्या शर्यतीत असणार यात काही शंका नाही. तर पाकिस्तानही या यादीत आहे. पाकिस्तानचा संघ सर्व सामने हे श्रीलंकेत खेळणार आहे. त्यामुळे त्यांना खेळपट्टीचा चांगला अंदाज असेल. त्यातही फक्त दोन स्टेडियममध्ये सामने होणार असल्याने पाकिस्तानही या शर्यतीत असेल. त्यामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली तर आश्चर्य वाटायला नको.
