IPL 2021 : हॅट्रिकदरम्यानचा ‘तो’ चेंडू सर्वोत्तम, हर्षल पटेलकडून फेव्हरेट विकेटचा खुलासा

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी मोठा विजय मिळवला.

IPL 2021 : हॅट्रिकदरम्यानचा 'तो' चेंडू सर्वोत्तम, हर्षल पटेलकडून फेव्हरेट विकेटचा खुलासा

IPL 2021 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL 2021) या जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीगमध्ये रविवारचा (26 सप्टेंबर) म्हणजेच यंदाच्या हंगामातील 39 वा सामना धमाकेदार ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाच सिंहाचा वाटा उचलला तो आरसीबीचा यंदाच्या हंगामात मुख्य गोलंदाज ठरलेल्या हर्षल पटेलने (Harshal Patel). हर्षलने जबरदस्त हॅट्रिक घेत मुंबईची मजबूत अशी लोअर ऑर्डर बॅटिंग लाईनप संपूर्णपणे भेदून टाकली. (It was planned delhivery to set him up, Harshal Patel calls dismissal of Kieron Pollard satisfactory)

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कर्णधार विराट कोहली (51) आणि ग्लेन मॅक्सवेल (56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 165 धावापर्यंत मजल मारली. ज्यानंतर 166 धावांचं आव्हान मुंबईसमोर होतं. मुंबईचा तगडा संघ पाहता त्यांच्यासाठी हे आव्हान पार करणं तसं फार अवघड नव्हतं. सुरुवातही उत्तम झाली होती. पण सलामीवीर क्विंटन डिकॉक बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. मुंबईला याचा मोठा झटका बसला. ज्यानंतरच्या खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का वापरला.

हर्षलची जबरदस्त हॅट्रीक

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दिकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचित करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला. संपूर्ण सामन्याचा विचार करता हर्षलने 3.1 षटकात केवळ 17 धावा दिल्या आणि एकूण 4 विकेट्स घेतल्या.

पोलार्डच्या विकेटने समाधान मिळालं

कोणत्या विकेटने त्याला सर्वात जास्त आनंद दिला, असे विचारले असता हर्षल पटेल म्हणाला की, “पोलार्डची विकेट सर्वात समाधानकारक होती. कारण त्याच्या धिम्या यॉर्करने पोलार्डला फसवले. पटेल म्हणाला की कायरन पोलार्डची विकेट अतिशय समाधानकारक होती, कारण ती महत्त्वाची विकेट होतीच, परंतु त्यासाठी वापरलेली ट्रिकदेखील तितकीच जबरदस्त होती. पोलार्डसारखा फलंदाज बाहेर जाणारा चेंडू सोडणार नाही पण जर तो यॉर्कर टाकला तर तो चुकू शकतो याबद्दल आम्ही संघाच्या बैठकीत बोललो. मी पोलार्डला चकमा देण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो.”

हर्षल ठरला तिसरा हॅट्रीकवीर

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघाकडून हॅट्रीक घेणारा हर्षल तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वात आधी प्रवीण कुमारने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध, त्यानंतर सॅम्युयल बद्रीने 2017 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रीक घेतली होती. त्यानंतर आता हर्षलनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रीक घेतली आहे.

इतर बातम्या

IPL 2021 : 4 संघ, 8 गुण आणि 1 स्थान… कोणता संघ मारणार बाजी, कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? वाचा सविस्तर एका क्लिकवर

IPL 2021: आधी विराटचं-मॅक्सवेलचं अर्धशतकं, मग हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई गारद, 54 धावांनी दारुण पराभव

(It was planned delhivery to set him up, Harshal Patel calls dismissal of Kieron Pollard satisfactory)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI