ENG vs IND : खेळवायचंच नव्हतं तर घेतलंच कशाला? भारताच्या 4 खेळाडूंना संधी न दिल्याने नेटकऱ्यांचा संतप्त सवाल
India Tour Of England 2025 : इंग्लंड दौऱ्यावर असलेले भारतीय संघातील 4 खेळाडू कमनशिबी ठरले. या चौघांपैकी तिघांना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र त्यांना संधी काही मिळाली नाही.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान केनिंग्टन ओव्हल येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. नियमित कर्णधार बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. तर शुबमन गिल भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी पाचवा सामना कोणत्याही स्थितीत जिंकायचा आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्रत्येकी 4-4 बदल केले आहेत. मात्र भारताचे असे 4 दुर्देवी खेळाडू आहेत ज्यांना या दौऱ्यातील 5 पैकी एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे या खेळाडूंना खेळवायचंच नव्हतं तर संघातच कशाला घेतलं? असा संतप्त सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कुलदीप यादवला संधी नाहीच
इंग्लंड दौऱ्यात भारताचे 3 खेळाडू हे दुर्देवी ठरले. फिरकीपटू कुलदीप यादव याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. टीम मॅनेजमेंटने कुलदीपवर विश्वास दाखवला नाही. तसेच अर्शदीप सिंह आणि अभिमन्यू ईश्वरन या दोघांचं नशिबच फुटकं निघालं. या दोघांना या दौऱ्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची आशा होती. मात्र तसं झालं नाही. कहर म्हणजे अंशुल कंबोज याला दौऱ्यादरम्यान बोलावून थेट पदार्पण करण्याची संधी दिली. मात्र या दोघांच्या प्रतिक्षेला या मालिकेत पूर्णविराम लागलाच नाही.
अभिमन्यू ईश्वरन
अभिमन्यू ईश्वरन गेल्या 2 मालिकांपासून भारतीय संघासोबत ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून फक्त प्रवास करतोय. मात्र अभिमन्यूला संधी मिळाली नाही. भारतीय संघ गेल्या अनेक वर्षांपासून तिसऱ्या स्थानी खेळणाऱ्या फलंदाजाचा शोधात आहे. मात्र हा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही. मात्र अभिमन्यूला तिसऱ्या स्थानी संधी द्यावी असं कर्णधार शुबमन आणि टीम मॅनेजमेंटला वाटलं नाही.
एन जगदीशन यालाही संधी नाही
भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला चौथ्या कसोटी दरम्यान बॅटिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे पंतला पाचव्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलं. पंतच्या जागी एन जगदीशन याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जगदीशनला पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र पंतच्या जागी जगदीशन याला संधी देण्यात आली. त्यामुळे जगदीशनच्या पदरीही निराशाच पडली.
