Test Cricket : एका कसोटीत सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितच्या नावावर, 6 वर्षांपासून विक्रम कायम
Most Sixes in One Test Match : रोहित शर्मा याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 3 वेळा द्विशतक ठोकलं आहे. तसेच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम केले आहेत. मात्र एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाबाबत रोहित शर्मा कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

टी 20i क्रिकेटच्या जमान्यात आता कसोटी सामने कंटाळवाणे वाटतात. एक सामना 5 दिवस कोण पाहणार? कसोटी सामना 5 ऐवजी 4 दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणी अनेकदा केली जाते. मात्र टी 20i च्या जमान्यातही कसोटी सामन्यांची क्रेझ कायम आहे. कसोटी सामन्यांचा थराराला कसलीच सर नाही, हे हाडाच्या क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. भारताने इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडवर चक्क 6 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह ही मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. तसेच काही वर्षांपूर्वी भारताने गाबामध्ये मिळवलेला विजयही प्रत्येक चाहत्याला लक्षात आहे.
क्रिकेट चाहत्यांनी राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे संयमी आणि चिवट फलंदाज पाहिले. तसेच वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासारखे कसोटीतही झंझावाती खेळी करणारे फलंदाजही पाहिले आहेत. सेहवागने कसोटी कारकीर्दीत टी 20i फलंदाजांनाही लाजवेल अशी बॅटिंग केलीय. मात्र सेहवाग एका सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फार मागे आहे. या निमित्ताने एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत कोणते फलंदाज आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
एका कसोटीत सर्वाधिक षटकार
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या डावात 6 षटकारांसह 176 धावा केल्या होत्या. तसेच रोहितने दुसऱ्या डावात 7 सिक्सच्या मदतीने 127 रन्स केल्या होत्या. अशाप्रकारे रोहितने एका सामन्यात सर्वाधिक 13 षटकार लगावण्याचा विक्रम केला. रोहितच्या या विक्रमाची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.
रोहितने त्या सामन्यात पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याचा विक्रम मोडीत काढला होता. अक्रमने 1996 साली झिंबाब्वे विरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. वसीमने नाबाद 257 धावांच्या खेळीत 12 षटकार लगावले होते. तर वसीमला दुसर्या डावात संधी मिळाली नाही. त्यामुळे वसीमच्या नावावर तब्बल 23 वर्ष एका कसोटीत सर्वाधिक 12 षटकारांचा विक्रम होता. मात्र रोहितने हा रेकॉर्ड ब्रेक केला.
रोहित तिसराच भारतीय
तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहित शर्मा याचा समावेश आहे. रोहित वीरेंद्र सेहवाग आणि ऋषभ पंत यांच्यानंतर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
