Asia Cup 2025 : हार्दिक-राशीदमध्ये थेट लढत, कोण ठरणार सरस?
आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार युएईमधील दुबई आणि शेख झायेद स्टेडियममध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत हार्दिक पंड्या आणि राशीद खान या दोघांना मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेतील 8 पैकी 7 संघांची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका, हाँगकाँग, बांगलादेश आणि ओमान या 7 संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर यजमान यूएईने अजूनही संघ जाहीर केलेला नाही. या स्पर्धेत पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तान, यूएई, ओमान आणि टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. यंदा ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मटने होण्याची एकूण तिसरी वेळ आहे. याआधी 2016 आणि 2022 साली टी 20 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी 2026 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेत अफगाणिस्तानचा कॅप्टन राशीद खान आणि भारताचा हार्दिक पंड्या या 2 स्टार ऑलराउंडरमध्ये मोठा विक्रम ब्रेक करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. दोघांमध्ये टी 20 आशिया कप स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
नक्की विक्रम काय?
टी 20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत. भुवनेश्वरच्या नावावर 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर हार्दिक आणि राशीद या दोघांनी टी 20 आशिया कपमध्ये 11-11 विकेट्स मिळवल्या आहेत. भुवीची यंदा निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे हार्दिक आणि राशिद यांच्यात भुवीचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी दोघांनाही 3-3 विकेट्सची गरज आहे. आता या दोघांपैकी पहिले 3 विकेट्स कोण घेतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व
दरम्यान भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून खेळणार आहे.
भारत-पाकिस्तान महामुकाबला
भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई तर 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध भिडणार आहे. मात्र 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला सामना होणार आहे.
