PAK vs SA : पाकिस्तानची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाला झटका, नक्की काय झालं?
Pakistan vs South Africa 1st Test Match Result : पाकिस्तानने गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत नव्या साखळीत आपली सुरुवात विजयाने केली आहे. पाकिस्तानने या विजयासह टीम इंडिया आणि श्रीलंकेला पछाडलं आहे.

पाकिस्तानने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने लाहोरमध्ये आयोजित या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी मात केली आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 277 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 51 रन्स केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 226 धावांची गरज होती. मात्र दक्षिण आफ्रिकेला चौथ्या दिवशी 132 धावाच करता आल्या. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 183 रन्सवर ऑलआऊट केलं आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाला झटका
पाकिस्तानला या विजयामुळे जबर फायदा झाला आहे. पाकिस्तानने या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये 2 संघांना मागे टाकलं आहे. त्यामुळे श्रीलंका आणि टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. मात्र पाकिस्तानची ही या साखळीतील पहिलीच मालिका आणि पहिलाच विजय आहे.
नोमान अलीचा ‘दस का दम’
पाकिस्तानचा स्टार स्पिनर नोमान अली याने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात प्रमुख भूमिका बजावली. नोमान अली याने दक्षिण आफ्रिकेला आपल्या फिरकीवर नाचवलं. नोमानने या सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या. नोमानने पहिल्या डावात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स मिळवल्या. नोमानने अशाप्रकारे एकूण 10 विकेट्स मिळवल्या.
तसेच वेगवान गोलंदाज शाहिन अफ्रिदी याने नोमान अली याला चांगली साथ दिली. शाहिनने दक्षिण आफ्रिकेला विजयी धावांआधी रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. शाहिनने 8.5 ओव्हरमध्ये 33 रन्स देत दक्षिण आफ्रिकेच्या 4 विकेट्स घेतल्या. शाहिनची ही चौथ्या डावातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शाहिनने याआधी 4 वर्षांआधी 43 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या होत्या. शाहिनने वेस्ट इंडिज विरुद्ध 2021 साली ही कामगिरी केली होती.
सामन्याचा धावता आढावा
पाकिस्तानने पहिल्या डावात 378 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 300 पारही पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेचं 269 रन्सवर पॅकअप झालं. त्यामुळे पाकिस्तानला 109 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. पाकिस्तानने या आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात 169 रन्स केल्या. पाकिस्तानची अशाप्रकारे एकूण 276 धावांची आघाडी झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 277 धावांचं आव्हान मिळालं. मात्र पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला त्याआधीच रोखलं आणि 93 धावांनी सामना जिंकला. दरम्यान उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 20 ऑक्टोबरपासून रावळपिंडीमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा असणार आहे.
