IND vs NZ: टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये ऋषभ पंत उशिराने दाखल होणार, प्रशिक्षकाने सांगितलं कारण
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. 7 जानेवारीपासून संघाचा कॅम्प लागला आहे. मात्र या कॅम्पमध्ये विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत नाही. कारण...

भारत न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली असून बडोद्याला कॅम्प सुरु झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू पोहोचले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत खेळल्यानंतर दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतले. असं असताना या संघात निवड होऊनही ऋषभ पंत काही पोहोचलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॅम्पमध्ये येण्यास उशीर का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना किमान दोन सामने खेळण्याची अट ठेवली होती. त्या दृष्टीने दिग्गज खेळाडू ही अट पूर्ण करून कॅम्पमध्ये रुजू झालेत. आता ऋषभ पंतचं नेमकं कारण काय? ऋषभ पंतने बीसीसीआयकडून परवानगी मागितल्यानंतर बडोद्याला उशिरा येणार आहे. बोर्डाने खेळाडूला संघात उशिरा येण्याची परवानगी दिली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, दिल्ली संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी सांगितले की, पंत 8 जानेवारीच्या सामन्यात खेळल्यानंतरच टीम इंडियामध्ये सामील होईल. ऋषभ पंत विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दिल्लीसाठी सर्व साखळी फेरीचे सामने खेळणार आहे. दिल्ली 8 जानेवारीला शेवटचा लीग स्टेज सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर पंत टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये सामील होईल. ऋषभ पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व आहे. दिल्ली ने सहापैकी पाच सामने जिंकून बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. विराट कोहली या पर्वात दिल्लीकडून दोन सामने खेळला.
दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वात आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेमुळे पंत उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकणार नाही. पण शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यासाठी संघासोबत राहू इच्छितो. हा सामना 8 जानेवारी रोजी होणार असून या सामन्यातील विजय दिल्लीला त्यांच्या गटात पहिले स्थान मिळवण्यास मदत करू शकतो. ऋषभ पंतने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 212 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
