‘रोहित शर्मा आणि विराट कोहली नक्कीच 2027चा वर्ल्डकप खेळतील’, भारतीय प्रशिक्षकाचं मोठं विधान
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या मालिकेकडे लागलं आहे. दोन्ही खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेटमधील आकडेवारीच सर्व काही सांगते. पण त्यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळली. या मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. तर विराट कोहली दोनदा शून्यावर बाद झाला आणि शेवटच्या वनडे चांगली खेळी करून गेला. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. 30 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका दोन्ही खेळाडूंसाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळायचं असेल तर या मालिकेतील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. आता भारतीय गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्कलने या दोघांबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांच्या मते हे दोन्ही दिग्गज खेळाडू 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धा नक्कीच खेळतील.
भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी सांगितलं की, ‘दोघंही नक्कीच 2024 वर्ल्डकप खेळतील. जर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट असतील तर ते नक्कीच खेळतील. त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यांना माहिती आहे की मोठ्या स्पर्धेत कसं खेळायचं ते..’ मोर्ने मॉर्केल यांनी पुढे सांगितलं की, ‘वनडे वर्ल्डकपसाठी अजून खूप अवधी आहे. दोन्ही क्वालिटी प्लेयर्स आहेत. ज्या पद्धतीने ते फिटनेसवर मेहनत घेत आहेत आणि खूशही आहेत. नक्कीच ते खेळतील. मी कायम अनुभवावर विश्वास ठेवला आहे. असा अनुभव आहे की जो कोणाकडे मिळू शकत नाही. नक्कीच ते वर्ल्डकप खेळतील.’
“गेले दोन आठवडे आमच्यासाठी निराशाजनक होते पण आता आमच्याकडे गोष्टींवर विचार करण्यासाठी काही दिवस आहेत,”, असंही मोर्ने मॉर्केल यांनी पुढे सांगितलं. “सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली सर्व ऊर्जा पांढऱ्या चेंडूच्या संघावर केंद्रित करणे. गेल्या काही वर्षांपासून आपण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहोत. येणाऱ्या आठवड्यांसाठी मी उत्सुक आहे. “, असंही म्हणाले. भारताचा पहिला वनडे सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रांचीत खेळला जाईल. त्यानंतर दुसरा वनडे सामना सामना 2 डिसेंबरला रायपूर आणि तिसरा वनडे सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल.
