Asia Cup 2025 : नवरा क्रिकेटर-बायको कॉमेंटेटर, आशिया कप स्पर्धेत स्टार जोडीची रग्गड कमाई होणार, कोण आहेत हे दोघे?
क्रिकेटमध्ये एखादी जोडी किती धावांची भागीदारी करते? याकडे चाहत्यांचं अधिक लक्ष असतं. मात्र क्रिकेट चाहत्यांचं आशिया कप स्पर्धेत एका मोठ्या जोडीकडे लक्ष लागून आहे. ही जोडी आशिया कप स्पर्धेतून किती कमाई करणार? याची चर्चा रंगली आहे. जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 9 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमेसामने असणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघात 19 सामने होणार आहेत. साखळी फेरीत एकूण 12 सामने होणार आहेत. त्यानंतर सुपर 4 मध्ये 6 सामेन खेळवण्यात येणार आहेत. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. तर यंदा या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे कॅप्टन या नात्याने सूर्यासमोर भारताकडेच आशिया कप कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
अनेक क्रिकेट स्पर्धांद्वारे खेळाडूंची कमाई होते. या आशिया कप स्पर्धेतही विजेता, उपविजेता संघ मालामाल होणार आहे. तसेच वैयक्तिक कामगिरीच्या जोरावरही अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांचं नवरा-बायकोच्या जोडीकडे लक्ष लागून राहिलं आहे. या नवरा-बायकोची आशिया कप स्पर्धेतून लाखोंची कमाई होणार आहे. ही जोडी नक्की कोण आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा प्रमुख वेगवान जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी तसेच स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन या नवरा-बायकोच्या जोडीबाबत चर्चा रंगली आहे. या जोडीची आशिया कप स्पर्धेतून कमाई होणार आहे.
जसप्रीत बुमराहची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बुमराह या स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र अखेरच्या क्षणी बुमराहने आपण उपलब्ध असणार, असं बीसीसीआयला कळवलं. त्यानुसार निवड समितीने बुमराहचा संघात समावेश केला. तसेच इंग्लिश कॉमेंट्री पॅनेलमध्ये संजना गणेशन हीची निवड करण्यात आली आहे.
संजना गणेशनची किती कमाई होणार?
संजनाची आशिया कप स्पर्धेतून नक्की किती कमाई होणार? याबाबतचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजनाला 20 ते 40 लाख रुपये मिळतील. तसेच बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त प्रत्येक टी 20i सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत 3 सामने खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह याला 9 लाख रुपये मिळणार, हे निश्चित आहे.
संजना गणेशन एकमेव महिला
आशिया कप स्पर्धेसाठी भारतातील 6 समालोचकांची निवड करण्यात आली आहे. या 6 जणांमध्ये 5 पुरुष आणि संजना गणेशन ही एकमेव महिला आहे. या 6 जणांमध्ये संजना व्यतिरिक्त समीर कोचर, रॉबिन उथप्पा, संजय मांजरेकर, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
