IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीरचा या खेळाडूला विरोध, मग गिलच्या वशिल्याने गुजरात टायटन्समधील क्रिकेटरची निवड!
Gautam Gambhir and Shubman Gill : ओळखीशिवाय काम होतं नाही, असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्येही हे वाक्य लागू पडतं. मात्र त्यासाठी तुमची आकडेवारीही तशी हवी. अशाच एका खेळाडूला त्याच्या कामगिरीच्या जोरावर आणि ओळखीमुळे इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

बीसीसीआय निवड समितीने 24 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. निवड समितीने या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेने टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर शुबमन गिल याच्याकडे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन या मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तसेच ऋषभ पंत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. गौतम गंभीर हेड कोचच्या भूमिकेत असणार आहेत.
निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी साई सुदर्शन याची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड केली. साईने आतापर्यंत आयपीएलच्या 18 व्या मोसमात कॅप्टन शुबमन गिलसह अप्रतिम कामगिरी केलीय. त्याच कामगिरीच्या जोरावर साईची भारतीय संघात निवड केली गेली, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्याचं कारणही तसंच आहे. साईला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यासाठी हेड कोच गंभीरचा विरोध होता. मात्र शुबमन गिल याने साईसाठी जोरदार फिल्डिंग लावली. शुबमनने गंभीरसह अर्धा तास चर्चा केली. गिल गंभीरची मनधरणी करण्यात यशस्वी झाला.त्यानंतर गंभीरने साईच्या नावाला हिरवा कंदील दिला, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
शुबमनच्या मनधरणीनंतर गंभीर तयार!
क्रिकब्लॉगरने बीसीसीआय सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरही डावखुरा फलंदाज होता. मात्र त्यानंतरही गंभीरने साईला विरोध करणं हे समजण्यापलिकडचं आहे. अनेक क्रिकेटपटू साईच्या नावाची चर्चा करत होते. मात्र गंभीरचा प्लान काही वेगळाच होता. मात्र शुबमन गंभीरचं मन वळवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे साईला संधी मिळाली.
साई तिसरा ओपनर!
दरम्यान साईची टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यासाठी ओपनर म्हणून निवड करण्यात आली आहे. साईला इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळणार की नाही? हे तेव्हाच निश्चित होईल. मात्र साई बॅकअप ओपनर आहे. साईकडे तिसरा ओपनर म्हणून पाहिलं जात आहे. साईने आयपीएल आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. साई या 18 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. साईने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत साखळी फेरीतील एकूण 14 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह एकूण 679 धावा केल्या आहेत. तसेच साईने 2024-2025 या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 76 च्या सरासरीने धावा केल्या. साईने या दरम्यान 1 द्विशतकी झळकावलं होतं.
