Asia Cup 2025 : स्पर्धेतील संपूर्ण Match Fees सैन्य दल-पहलगाम हल्ल्यातील कुटुंबियांना, कॅप्टन सूर्याचा निर्णय
Suryakumar Yadav IND vs PAK : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत विजयानंतर मोठी घोषणा केली. सूर्याने या निर्णयासह चाहत्यांची मन जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा तिसरा आणि एकूण सलग सातवा विजय ठरला. या विजयानंतर कॅप्टन सूर्याने मोठी घोषणा केली आहे. सूर्याने आशिया कप 2025 स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन हे सैन्य दलाला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्याने एक्स पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. सूर्याच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
सूर्याने एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं?
“मी या स्पर्धेतील माझी मॅच फी आपल्या सैन्या दलाला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं सूर्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सूर्याकडून एकूण 21 लाख रुपयांची मदत
सूर्यकुमार यादव याने मदत म्हणून मॅच फीस देणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र सूर्याने आकडा सांगितला नाही. पण हा आकडा जगजाहीर आहे. बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त एका टी 20i सामन्यांसाठी 3 लाख रुपये दिले जातात. भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण 7 सामने खेळले. त्या हिशोबाने सूर्याला मॅच फीस म्हणून 21 लाख रुपये लागू होतात. या हिशोबाने सूर्या हे 21 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं स्पष्ट आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी निष्पाप 27 पर्यटकांचा जीव घेतला. या 27 जणांमध्ये देशातील विविध राज्यातील नागरिकांचा समावेश होता. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई करत या दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता केला होता.
टीम इंडियाकडून तिन्ही सामन्यात पराभूत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेनिमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध खेळणार होती. पहलगाम हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानबाबत संतापाची लाट होती. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाच्या क्रिकेट संघासह टीम इंडियाने खेळू नये, या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी देशवासियांकडून करण्यात आली होती. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. तीव्र विरोधानंतरही सामने झाले.
सूर्याचा मोठा निर्णय
Sura going to donate all his match-fees from #AsiaCup2025 to the Indian Army!
Absolutely nothing like controversial. Keep those Pakistanis crying 🥳 pic.twitter.com/gYNad94ML6
— Lala (@FabulasGuy) September 28, 2025
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरी (14 सप्टेंबर), सुपर 4 (21 सप्टेंबर) आणि अंतिम फेरीत (28 सप्टेंबर) अशा एकूण तिन्ही वेळा पाकिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉसदरम्यान पाकिस्तानच्या कर्णधारासह हस्तांदोलन केलं नाही. तसेच सामन्यानंतरही भारताने पाकिस्तान संघातील खेळाडूंसह हँडशेक केलं नाही.
तसेच आशिया कप विजेत्या संघाला पीसीबी-एसीसी अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्वी ट्रॉफी देणार होते. त्यामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीतील विजयानंतर नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. टीम इंडियाने अशाप्रकारे शेवटपर्यंत पाकिस्तान विरुद्ध आपला विरोध कायम ठेवला.
