IND vs AUS : भारताचे 2 खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाहीत, कारण काय?
Indian Cricket Team : टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेची सांगता विजयाने केली. त्यानंतर आता टीम इंडिया काही तासांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघणार आहे. मात्र भारताचे 2 खेळाडू ऑस्ट्रेलियाला न जाता आपल्या घरी परतणार आहेत. जाणून घ्या कारण काय.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने लोळवलं. भारताचा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील सलग दुसरा तर एकूण चौथा विजय ठरला. तसेच टीम इंडियाचा ही विंडीज विरुद्धचा सलग 10 वा कसोटी मालिका विजय ठरला. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज आहे.
टीम इंडियाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरने होणार आहे. त्याआधी टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा दिल्लीत झाला. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यासाठी दिल्लीला जमणार आहेत. मात्र टीम इंडियाचे 2 खेळाडू हे दिल्लीहून ऑस्ट्रेलियाला न जाता आपल्या घरी परतणार आहेत. तो 2 खेळाडू कोण आहेत? तसेच ते ऑस्ट्रेलियाला का जाणार नाहीत? हे जाणून घेऊयात.
2 खेळाडू कोण?
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि ओपनर साई सुदर्शन हे दोघे दिल्लीवरुन घरी परतणार आहेत. जडेजाची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरजसाठी निवड करण्यात आलेली नाही. तर जडेजा टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तर साईला दोन्ही मालिकांसाठी संधी दिलेली नाही. त्यामुळे हे दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाणार नाहीत.
विराट कोहली-रोहित शर्मा परतणार
टीम इंडियाची स्टार-अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एकदिवसीय मालिकेतून कमबॅक होणार आहे. दोघांनी 9 मार्चला अखेरचा एकदिवसीय सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर दोघे थेट या मालिकेतून मैदानात उतरणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
शुबमन कॅप्टन, श्रेयस उपकर्णधार
या मालिकेतून टीम इंडियात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने एकदिवसीय कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती केली. शुबमन या मालिकेतून कॅप्टन म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे शुबमनवर आता फलंदाजी आणि नेतृत्व अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे शुबमन-श्रेयस जोडी कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
